(आधीच सांगून ठेवतो बाबांनो! खालील लेख शुद्ध उपहास आहे. त्यात कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. कलाकार, निर्माते तर नाही आणि छत्रपती शिवाजी महराजांचा तर नाहीच नाही. तरी कृपया करून कोणीही अति-संवेदनशील माणसाने उडणारे तीर पकडू नयेत!)
सर्वोत्कृष्ट शिवाजी महाराज कोण साकारतो?
हा सध्याचा हॉट टॉपिक. पण खरंतर हा सवाल पैदाच का व्हावा? अरे आपली मराठी चित्रपट सृष्टी ही इतकी प्रगत आणि पुढारलेली आहे की या प्रश्नाचे उत्तर त्यांनी १९७४ मध्येच देऊन ठेवलंय! चौक गये?? शाळेत लक्ष देण्यापेक्षा चित्रपट पहिले असतेत तर ही वेळ आली नसती! तुम्हाला नसणारच ठाऊक! पण मला ठाऊक आहे ना! सांगतो ऐका!!
सुबोध भावेनी काल “हर हर महादेव” चित्रपटाची घोषणा करणारी पोस्ट टाकली आणि एकंच हाहाकार मजला. फेसबुकवरील मावळे मंडळींनी डोळ्यात सुरमा घातलेल्या भाव्यांवर चहू बाजूने हल्ला चढवला. एकच कापाकापी सुरु झाली. या धुमश्चक्रीत कोणीतरी भावेंना “तू राम रहीम आहेस!” अशी पण टपली मारुन मोकळं झालं! हे पाहताच भाव्यांच्या बाजूचे सैन्य मैदानात उतरले. मग कोणी मांडलेकराला खिंडीत गाठून चोपला, कोणी शंतनू s s s असा मोघ्यांच्या नावे टाहो फोडला, अमक्याला तमक्याने स्क्रीनवर कसा खाल्ला और डकार भी नही दिया अशा आरोळ्या घुमू लागल्या.ऐन रणांगणाच्या बाजूलाच पविलिअन मध्ये बसून – म्हणजे पारावर बसून – जुने जाणते म्हातारे मावळे नसलेल्या पिळदार मिशांना पीळ देत,”अरे, काय तो सूर्यकांत! अरे, काय तो चंद्रकांत! चायला पूर्वीचं ऍक्टिंग राहिलं नाही!” असा खेद व्यक्त करू लागले तंबाखूचे बार फिरवू लागले. काही लोकं तर “ह्या!! पण मराठी चित्रपटात हाय ना, दमच नाय काय!! नोलन पाहिलंय का नोलन? नाही? मग प्रेमम तरी पाहिलंय का? नाही? हट्ट राव! आयुष्य वाया गेलं तुमचं!” असं सुनावू लागले.
भाव्यांचे संख्याबळ कमी पडू लागले. लोकं काही ऐकेनात. त्यांची सपशेल माघार होताना मला दिसत होती पण “कुत्ता जाने, चमडा जाने” या न्यायाने मी मात्र शांतपणे (काल्पनिक ) विडी शिलगावली आणि बाजूला इंस्ताग्रामच्या कट्टयावर बसून आज मी फेसबुकवर का आलो? हे आठवत बसलो. कारण फेसबुकवर मी लॉग-इन केले खरे पण आल्याआल्या या तुंबळ घमासनाने स्वागत केले आणि फेसबुकवर का आलो होतो हेच विसरलो! मग रिकामटेकड्यास चाळा काय? म्हणून बालपणी जेव्हा आम्ही चित्रपट समीक्षक म्हणून कारकीर्द गाजवली होती, ज्या काळी आम्ही सर्वोत्कृष्ट शिवाजी महाराज साकारणारा नटसम्राट या दोन डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला होत, त्या वैभवशाली काळाच्या आठवणी चाळण्याचा चाळा आरंभला. अहाहा! काय ते दूरदर्शन आणि काय त्या रम्य-अगम्य आठवणी!
रविवारी दुपारी 4 वाजता मराठी चित्रपट लागायचा. आपले सर्वांचे लाडके लक्ष्या-अशोकमामा यांचे चित्रपट लागायचे आणि फुल्ल धमाल यायची. आमच्याकडे तेव्हा केबल टीव्ही नव्हता. “केबल टीव्ही नसेल तर मुलं अभ्यासात लक्ष घालतील आणि परीक्षेत चांगले मार्क आणतील!” असा आमच्या वडिलांचा गोड गैरसमज. त्यांच्या या अपेक्षेचा दरवर्षी आम्ही न चुकता भंग केला. मग त्यांनी छडीने आमच्या पार्श्व्भागाचा लालभडक रंग केला,पण जाऊदे ती वेगळी गोष्ट! दुखऱ्या आठवणी आता नको! तर या रविवारी कॉमेडी चित्रपट न लागता, “राजा शिवछत्रपती” अशी अक्षरं टीव्ही वर झळकली आम्ही बाल समीक्षक भलतेच खूष!! लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज आपले आवडते! म्हणून लगेच सावरून बसलो! पुढे जे काय समोर वाढून ठेवलं होतं त्याने माझ्या बालमनावर काय परिणाम झाला हे लिहायला शब्द नाहीत. त्या पेक्षा तुम्ही त्या चित्रपटाची माझ्या कल्पनेतली पटकथा वाचा!

सुरुवातीचा सीन -ओपनिंग शॉट :
(मुळात चित्रपटाच्या बजेटच्या अस्तित्वाबद्दल शंका असल्याने इथे बर्याच गोष्टी प्रेक्षकांनी कल्पनाशक्तीने समजून घ्यायच्या आहेत, असा निर्मात्याने प्रांजळपणे हेतू स्पष्ट केलेला असतो. चित्रपटाचे बरेचसे बजेट हिमानी शिवपुरीचा खोल गळ्याचा मुजरा आणि डॉनला पकडणाऱ्या कमिशनरला औरंगजेब बनवण्यात खर्च झालेले आहे! )
लाईट्स!!
वर भगवा फडफडतोय. महाराज गलबतावर उभे. गलबत समुद्रात उभी. खरं म्हणजे महाराजांसारखा मेकअप केलेला एक पावडरने ‘लेपलेला’ इसम एका होडक्यात उभा असतो. आपण त्याला गलबत समजायचं. सोबत एक गोलमटोल अंगरक्षक मावळा उभा. (बजेटमुळे भाडं एकाचंच परवडतं) पण याच्याच अंगाचं रक्षण करायची वेळ येईल अशी भीती वाटते! दुसरा जख्ख म्हातारा मावळा! मिश्या कल्ल्यात मिसळलेल्या वगैरे!तो फुकटात काम करतो. बाजूच्याच गावातला आजोबा असतो कुणाचा तरी. घरी बसून विड्या फुंकण्यापेक्षा इथे येणं काय वाईट? सुनेची बोलणी तरी खावी नाही लागणार! पण म्हातारा मावळा इज ए मस्ट हा! का म्हणजे? टिप्पिकल गावरान ठसक्यात पंचचे डायलॉग अजून कोण मारणार? मुख्य अभिनेत्याने डायलॉग मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मेकप पडेल ना! आणखी एक महत्वाचे कारण आहे! सांगू? सांगूनच टाकतो! पुढे सिंहगड घेताना मग शेलारमामा म्हणून यालाच उभा करायचा! लक्षात कोणाच्या येतंय! आणि लक्षात यायला थेटरात लोकं टिकणार थोडी आहेत तो पर्यंत! तर म्हाताऱ्या मावळ्यानंतर पाहिजे आपल्याला एक इमानदार ‘मुल्कला मजहब पेक्षा मोठं’ मानणारा इमानदार मुसलमानी अधिकारी! हाच इसम नंतर विजू खोटेचा (फाझल खान बिन अफजल खान) डूप्लिकेट म्हणून वापरला गेलाय असा दाट संशय मला आला!
महाराज पाठमोरे उभे. समोर दर्याकडे पाहून एक डायलॉग बोलतात. समुद्राच्या लाटा आज मुक्त झाल्या तत्सम. दौलतखानला भरूनच येतं. तो डायरेक्ट कंबरेचा बिचवा उपसतो. इतका वेळ तो महराजांचा ढेरपोट्या अंगरक्षक शुंभासारखा बघतोय. तरी बऱ दौलतखान चांगला होता (चित्रपटात) म्हणून तो स्लो मोशनमध्ये स्वतःचेच बोट बोटीवर उभे राहून आडवे चिरतो. ऑरेंज रसना सदृश रक्त बाहेर येते ते तो समुद्रात सोडतो. समुद्राचे पाणी लाल होते. ते कापलेले बोट पाहून म्हाताऱ्या मावळ्याची झोप मोडते. त्याला आठवते की आपल्याला वाक्य नसलं तरी भाव चेहऱ्यावर उमटवावे लागतील! म्हणून तो तसे निष्फळ प्रयत्न करतो. आणि मग या चित्रपटाचा महानायक, ज्येष्ठ निर्माते, नाटककार आणि नट “श्रीराम गोजमगुंडे” आक्रोश करतात! “दौलतखान!!!” अशी आर्त किंकाळी त्या एकाच सीनमध्ये मेकअपचा पडदा छेदून आणि प्रेक्षकांचे ह्रिदय भेदून जाते! गोजमगुंडेंचे स्वर आणि भाव असे काही वर जातात की मला तर ५वी-६वीत असतानाच हे उत्तर सापडलेलं की सर्वोत्कृष्ट शिवाजी महाराज कोण साकारतो!
पटत नाही?
खाली व्हीडियो देतोय. डोळे भरून येईपर्यंत पहा!
आणि आयुष्याला अगदीच कंटाळला असाल. तर यूट्यूबची लिंक पण देतो! अख्खा चित्रपटपाहून घ्या! जगलावाचलात तर सांगा कसा वाटला ते!
तळटीप्स:
- तुम्हाला वरील विडम्बानात्मक लेखात काही काही वाक्ये पुलंची किवा शिरीष कणेकरांची चोरली किंवा ढापली आहेत असं वाटतंय का? कृपया तसा गैरसमज करून घेऊ नका. मी वाक्य चोरली नाहीत,फक्त उसनी घेतली आहेत!
- हा लेख विडंबन असून त्यात तोफेत दारू जशी ठासून भारतात आणि काही लोकं पोटात जशी दारू ढोसून भरतात तसा उपहास भरला आहे. यात छत्रपतींचा मी अपमान केलाय असं तुम्हाला वाटत असेल तर तसा कुठेही नाही. उपहास, मस्करी केली आहे फक्त नटांची, निर्मात्यांची आणि त्यांच्या अक्टिंगची.
- या कोळशाच्या काळ्या ठिक्कर खाणीत एक हिरकणी आहे आणि ती म्हणजे सईबाईसाहेब साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील! <3 <3 <3
- आणि लास्ट, बट नॉट द लीस्ट , शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजी style मध्ये म्हणायचं झालं तर, “ शिवाजी महाराज म्हणून श्रीराम गोजमगुंडे??? अरे आम्ही काय मेलो होतो का?”
– प्रांजल वाघ
०४-०९-२०२२