कात्राबाईच्या कुशीत चिंब भिजताना…

by Pranjal Wagh
490 views
परत जाताना उघडलेल आभाळ!

रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारा थांबायचं नाव काही घेत नव्हत्या. हा परतीचा पाऊस भलताच निष्ठावान निघाला. रात्री १०:१५ वाजता आमच्या बसने बोरीवली सोडलं. असंख्य खड्ड्यातून रस्ते शोधत, बेधुंद, बेभान ट्रक्स आणि गाड्या चुकवत आमची गाडी जेव्हा कुमशेत गावी पोहोचली तेव्हा सकाळचे ८:३० आणि आमच्या चालकाचे १२ वाजले होते. आणि इतकं होऊन सुद्धा पाऊस काही आमची साथ सोडायचं नाव घेईना. विक्रम राजाच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखा तो मध्येच गडगडून हसत होता. कुमशेत आल्यावर मग हे ओझं घेऊन आम्ही उठलो, आळोखे-पिळोखे देत, हाडांचा हिशेब मांडला आणि आपापल्या पाठ-पिशव्या घेऊन सरू अस्वलेंच्या घराची पडवी गाठली.

‘श्री. सरू (सराजी) चिमा अस्वले’ म्हणजे सह्याद्रीतलं जुनं खोड! सत्तरीकडे वय झुकलं तरी पाठीचा कणा आजही ताठ! चाल अशी की शहरातील तरण्याबांड गड्याला लाजवेल! समीरने यांच्याशी आधीच बोलणी करून ठेवली असल्यामुळे अस्वले मामांनी आमची व्यवस्था करून ठेवली होती. गेल्या-गेल्या मुलींना कपडे बदलायला खोली दिली. प्रातर्विधीसाठी शौचालय वापरायला दिले.

“गरम पाणी देऊ का हात-तोंड धुवायला?”, असं किमान १० वेळा विचारलं!

“ अरे पोराहो, चपला काढा त्या. आत येऊन बसा! फरशी होईल खराब, काई होत न्हाई!”, हा आग्रह वेगळाच!

रात्रभर प्रवास करून थकलेली पोरं आणि त्यांच्या पोटात उसळलेला भुकेचा आगडोंब चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असल्याने मग त्यांनी गरमा-गरम पोहे आणि कोरा-करकरीत वाफाळता चहा दिला. पोटभर खाल्ल्यावर, सामानाची बांधाबांध करून मग आम्ही निघालो आणि सोबत पायात चप्पल, हातात जाडजूड काठी, न्याहारीची शिदोरी आणि डोक्यावरून घोंगडी टाकून सरूमामा अस्वले आमच्या सर्वांच्या पुढे रस्ता दाखवायला!

बेत होता कात्राबाईचा डोंगर चढण्याचा. सप्टेंबर महिन्याचा मध्य आणि गणपती येऊन गेलेले असल्यामुळे  पाऊस कमी असावा असा आमचा अंदाज होता. पण मुंबई सोडल्यापासूनच त्याचा रोख आमच्या लक्षात आलेला. त्यात गावात पोहोचल्यावर मामांनी सांगितलं, “ गेले ८ दिवस पडतोय त्यो!” अविरत पडणारा पाऊस, आणि आजूबाजूला नुसते ढगच-ढग! यामुळे कात्राबाईचा डोंगर सोडा पण त्याची धूसर आकृती सुद्धा दिसत नव्हती! मग कात्राबाईच्या माथ्यावरून दिसणारा आजोबा डोंगर , रतनगड, कळसुबाईची डोंगररांग हे पाहण्याची स्वप्नं आम्ही त्या पावसातच अर्ध्य म्हणून वाहून टाकली! या परतीच्या पावसाने परतताना आम्हाला चांगलेच धुवून काढले होते!

अंगात रेनकोट घालून देखील काही उपयोग झाला नाही. सरूमामांच्या घरातून निघाल्यावर अवघ्या काही मिनिटातच पावसाच्या थेंबांनी आमच्या रेनकोटच्या कडक पहाऱ्यातून चोरवाटा शोधल्या. ते थंडगार थेंब जसे पाठीवरून खाली उतरू लागले तसे पाठीचा कणा शहरून उठला आणि डोळ्यांवरची रेंगाळणारी झोप आणि अंगातला आळस कुठल्या कुठे पळून गेले! इंद्रायणी भाताची शेती, बेभान होऊन आडवे-तिडवे वाहणारे झरे आणि पाय रुतवणारा मऊ-मऊ चिखल यांच्यातून वात काढीत आम्ही निघालो!

पूर्वी २००८-०९ साली मी आणि माझा मित्र मंगेश हळबे, “ग्रीन कार्पेट” नावाचा एक ट्रेकिंग ग्रुप चालवायचो. पण मग वाढणारी गर्दी आणि त्याच त्याच ठिकाणी जावे लागणे यात स्वतःचं ट्रेकिंग हरवून जाऊ लागलं. तसा मी ग्रुप सोडून स्वतःच ट्रेक करू लागलो. आजकाल आलेलं ट्रेकर्सच विक्रमी पीक याला कंटाळून सहसा ग्रुपसोबत ट्रेकला जाण बंदच केले होते. पण कात्राबाई नाव ऐकून मी Owlet Outdoorsच्या या ट्रेकला यायला तयार झालो. गर्दीची थोडी भीती तर होतीच पण खरं सांगायचं तर या ट्रेकला आम्ही १३ जण असूनही अगदी हसत-खेळत, रमत-गमत आमची चढाई सुरु होती! चढाई कसली? जवळजवळ पहिला एक दीड तास निव्वळ सपाटीवरची आरामशीर चाल! कुमशेत हे छोटसं गाव तसं सह्याद्रीच्या पठारावरच पण तिथून देखील आम्हाला २.५-३ तास चढाव लागणार होतं कात्राबाईचा माथा गाठण्यासाठी! एकमेकांचे ‘पाय ओढत’, वाटेतले ओढे पार करत आम्ही शेवटी चढाला लागलो!

मध्येच सरू मामा आणि समीर थांबले. रस्त्याच्या कडेला एक इंग्रजकालीन ‘मैलाचा दगड’ उभा होता. त्यावर इंग्रजी ‘10’ आकडा कोरलेला. याचा कदाचित अर्थ असा की रतनवाडीपासून इथ पर्यंतचा पल्ला १० मैलांचा आहे. इंग्रजांच्या काळात या वाटेवर बरीच वर्दळ असावी आणि याचाच अर्थ ही सह्याद्रीतील प्राचीन घाटवाट असणार! चढाला लागून थोडे पुढे गेल्यावर असे आणखी काही मैलाचे दगड आम्हाला लागले. कुठे रस्त्याच्या कडेला झाडीत लपलेला तर कुठे चक्क पाण्याच्या प्रवाहात पडलेला! ऐतिहासीक ठेवा जपण्याची ही अनोखी पद्धत बहुदा जगात इतरत्र कुठेच नसावी!

चढ चढून थोडे वर आल्यावर मग आपण कात्राबाईच्या कुशीत शिरतो आणि तिथे सुरु होते ती प्राचीन घाटवाट! आणि इथे जागोजागी आपल्या नजरेस पडतात ते दगड पोखरून सुरुंग लावल्याच्या खुणा! इंग्रजांनी बहुदा या घाट रस्त्याचे रुंदीकरण केले असणार! एखाद्या आधुनिक, डांबरी घाट रस्त्यासारखा वळणदार आणि क्रमिक चढ असणारा हा कात्राबाईचा घाट अजिबात दमछाक करत नाही. आणि त्यात जर वरुण राजाची कृपा-वृष्टी असेल तर मग दम लागणे वगैरे सर्व विसरून जायचे!

या रस्त्याने चढता चढता आम्हाला एका कपारीतून काही माणसांचे आवाज ऐकू आले. समीर म्हणाला, “ बहुतेक दुसरा ग्रुपआहे! कदाचित बेलोसे येणार होतं ग्रुप घेऊन!” विनायक बेलोसे हा आमचा पुण्याचा ट्रेकर मित्र प्रवासवेडे नावाचा ट्रेकिंग ग्रुप चालवतो. पण मला मात्र शंका आली, “ नाही रे, बहुतेक गावकरी आहेत!” असं मी बोलून गेलो खरं पण अगदी काहीच पावले पुढे गेलो न गेलो तो ट्रेकर मंडळी दिसली! विसावा घेण्यासाठी म्हणून ते एका कपारी खाली थांबले होते. आणि त्यात खरोखर आमचा मित्र विनायक बेलोसे होता! असा एखादा मित्र कुठेतरी अवचित डोंगरात भेटल्यावर आनंदाला पारावर राहत नाही! पुढे होऊन गळाभेटी होणे, विचारपूस वगैरे करून मग आम्ही निघालो वर!

इथे मात्र मला जरा मोकळं रस्ता मिळाला. सह्याद्रीच्या जंगलात एकट्याने फिरणं म्हणजे एक पर्वणी असते. आणि मला तो आनंद लुटायचा होता. मग मी (नेहमीपेक्षा) थोडा अधिक स्वार्थी झालो! चालण्याचा वेग वाढवत माझ्यामधील आणि इतरांमधील अंतर वाढवलं! रस्ता तसा सोपा होता. त्यात पावसाची रिप-रिप आणि सुटलेलं सह्याद्रीच वेड वार! मग त्या वाऱ्याने मला थोडं आणखी वेडं केलं आणि मी चक्क पळत निघालो वर! आजकाल या गोष्टीला “ट्रेल-रनिंग” का काहीसं म्हणतात म्हणे! पण मस्त धावत मी बराच पुढे निघून आलो! आणि त्याच वाटेवर एक भलं-मोठ्ठ झाड आडव पडलं होतं, त्याच्या खोडावर चढून इतरांची वाट बघत विसावलो!

निसर्गाच्या कुशीत विसावून तटस्थपणे त्याचे निरीक्षण करण्यात एक वेगळंच सुख आहे! आणि निसर्गाचा आस्वाद एकट्याने घेण्यात जरा अधिकच मजा आहे! त्या झाडाच्या शेवाळलेल्या ओल्या खोडावर मी विसावलो. क्षणभर डोळे मिटले आणि आजू-बाजूचं जंगल “ऐकू” लागलो! दूर कुठेतरी गडगडू लागले होते. पावसाच्या टपोऱ्या थेंबांची धीमी आणि सातत्यपूर्ण रिपरिप,  उंचच-उंच वृक्षांच्या चिंब ओल्या पानांवर टप-टप आवाज करीत धरणीकडे झेपावत होती! ते सगळ पाणी कुठून कुठून झिरपून, एकत्रित होत होते आणि त्यांचे असंख्य झरे डोंगराच्या पायथ्याकडे खळाळत वाहत होते. पुढे कुठेतरी हेच झरे एकमेकांना भेटत आणि मग यांचे रुपांतर एका मोठ्या शुभ्र प्रपातात होऊन तो घोंगावत कुठल्यातरी कड्यावरून धीरगंभीर नाद करत खाली धरणीवर कोसळे! आणि या नादाने सारं जंगल भरून गेलं होतं! हा धीरगंभीर आवाज ऐकत शांतपणे झाडांच्या फांद्यांवर, पानांच्या आड लपून बसले होते अनेक पक्षी! जे दिसत नव्हते पण त्याचं अस्तित्व जाणवत होतं. माझी खात्री आहे की त्यांनी मला केव्हाच पाहिलेलं होतं! हे सगळ बघायला मला डोळे उघडायची गरजच नाही पडली! नुसत्या कानांनीच आपण हे सारे ऐकायचे मनःचक्षुंसमोर हे चित्र आपोआप उभे राहते! हीच तर जंगलाची जादू आहे! त्याचा सहवास एखाद्या दगडाला सुद्धा कवी बनवू शकतो!

डोळे उघडून जरा भानावर आलो आणि लक्षात आले की आपले मित्र काही अजून आलेच नाहीत! मग थोडं माग जाऊन पहिले तर मरिओ सर आणि नाची, हे दोघं येताना दिसले. शीळ घालून त्यांचे लक्ष वेधून घेतले. तसे ते लगबगीने वर आले आणि जवळ येताच म्हणाले,

“ अरे तू कुठे गायब झाला होतास? बाकी सगळे पुढे निघून गेले!”

“पुढे गेले? पण कसे? हाच तर मुख्य रस्ता आहे!”

“मागून एक शोर्ट-कट होता! तिथून पुढे गेले! आणि तू सापडला नाहीस म्हणून तुला घ्यायला आम्ही आलो!”

भलतीच गडबड झाली म्हणायची! लगबगीने आम्ही पुढे निघालो. काही पावलं पुढे गेल्यावरच अख्खा ग्रुप माझी वाट बघत उभा होता.तिथे पोहोचून मी काही बोलण्या अगोदरच मरिओ सर मागून चालता चालता बोलले, “ ये रस्ता भटक गया था! अकेला बैठ के रो रहा था! आम्ही त्याला घेउन आलो!” हे ऐकताच अख्ख्या ग्रुपमध्ये हशा पिकली! आणि मग आम्ही तसेच पुढे चढू लागलो! थोड्याच वेळात एक छोटंसं पठार लागतं. तिथून पुढे गेलो की एक खिंड लागते जिथे तीन रस्ते फुटतात. उजवीकडचा रस्ता मुडा डोंगरावर जातो. समोरची वाट खाली रतनवाडी मध्ये उतरते. त्याच वाटेवर एक फाटा फुटतो जिथून थेट रतनगड गाठता येतो. आणि डावीकडची वाट थेट कात्राबाई शिखरावर घेऊन जाते. या जागेला “कात्रा खिंड” म्हणतात!

इथून पुढे गेल्यावर कात्राबाईचं ठाण लागतं! एका दगडी चौथऱ्यावर कात्राबाईची शेंदूर फसलेली दगडी मूर्तीवजा शीळा उभी आहे. समोर एक दगडी दिवा आहे! तिच्या पाया पडून पुढे गेलो. लवकरच माथ्यावर पोहोचलो. ढग आणि पाऊस यांच्यामुळे काहीच दिसत नव्हते. पण या परिस्थितीही काही ठिकाणी टोपली कारवी फुलली होती! ७ वर्षांनी फुलणारी कारवी आणि तिची जांभळी फुले  पाहायला मिळणे यासाठी थोर नशीब लागतं! सोनेरी सोनकीने देखील आपलं सोनेरी अस्तित्व आम्हाला दाखवलं आणि मग फोटो काढण्यासाठी एकच धांदल उडाली! मनसोक्त फोटो काढून झाल्यावर मग शेवटी आम्ही मोर्चा मागे वळवला आणि उतरायला सुरुवात केली!

डोंगरवाट जितकी चढायला कठीण किंवा दमछाक करणारी होती तितकीच परतीची वाट नाही म्हणलं तरी थोडीशी कंटाळवाणी भासली. कारण आपण जरी पावसात चिंब ओले भिजलो असू तरीही आता पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते! त्यामुळे झपझप पावले पडू लागली आणि तासा-दीड तासात आम्ही मोठ्या ओढ्याजवळ आलो. तिथे काही मंडळींना पाण्यात डुंबण्याची लहर आली! मग आम्ही बर्फासारख्या पाण्यात यथेच्छ डुंबून घेतलं अन् ताजेतवाने झालो! रात्रभर खड्ड्यातून धक्के खात केलेला प्रवास, मोडकी झोप आणि आताचा ट्रेक या सगळ्यामुळे जो काही थकवा आलेला तो पुरता नाहीसा झाला!

समीरने मग सगळ्यांना इच्छा नसताना पाण्याबाहेर काढले आणि आम्ही निघालो कुमशेत गावी, अस्वले मामांच्या घरी! तिथे गेल्यागेल्या ओलेचिंब कपडे बदलले. पाऊस एखाद्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यासारखा न थांबता बरसत होता. इतका की सगळंच भिजून ओले चिंब झालं होतं. “पावसाचं पाणी झिरपत झिरपत थेट हाडांपर्यंत ओल गेली की काय?”, असा एक विचार मनाला चाटून गेला!

कपडे बदलून लगोलग मोर्चा वळवला स्वयंपाकघराकडे! धडाडून पेटलेल्या चुलीची ऊब आणि पोटात उठलेल्या भुकेची आग काही शांत बसू देई ना! मामींनी आणि त्यांच्या सुनेनं झकास स्वयंपाक करून ठेवला होताच! कोबीची भाजी, मटकी उसळ, वरण, भात, चपाती, पापड आणि या सगळ्यांवर कळस म्हणून झणझणीत खर्डा!! या सगळ्यांवर पोट फुटेस्तोवर आडवा हात मारला तरी मामांचा आग्रह संपेना!

“उसळ देऊ का?”

“ भात घ्या जरा!”

“ अहो काय तुम्ही मुंबईची मंडळी? नीट  जेवतच नाही!”, भात नको म्हंटल्यावर नाराज होऊन!

“अगं लक्ष कुठाय तुझ? त्यांना विचार जरा भात हवाय का!”, असं मधूनच सुनेला दम देणं

तृप्त मने आणि तुडुंब भरलेली पोटं घेऊन, मामांना येतो असे सांगून आम्ही निघालो! बसमध्ये मग मी खिडकीजवळची जागा पटकावली आणि काय आश्चर्य! काही क्षणात आभाळ उघडलं! ढग आणि धुक्याने वेढलेला सह्याद्री आपलं विराट रूप घेऊन आमच्या समोर प्रकट झाला! भटकंतीच चीज झालं! आणि मग रस्त्यांवरील खड्डयांचं काही वाटेनासं झाला!

– प्रांजल वाघ

२३.०९.२०२२

ट्रेक मेम्बर्स:

  1. समीर पटेल
  2. प्रांजल वाघ
  3. मारिओ मास्करेन्हास
  4. कुणाल सूर्यवंशी
  5. स्टेफी महाडिक
  6. तेजल वाणी
  7. मीता मेहेर
  8. जे पी शेट्टी
  9. प्राची सामंत
  10. नाची रामनाथन
  11. रोहित देवेन्द्र
  12. प्रणय गावंड
  13. मयुरी दाते

कात्राबाई ट्रेकवरील आणखी काही छायाचित्रे!

18 comments

Anirudha September 27, 2022 - 1:18 AM

भन्नाट. सरु मामांसाठी ????????

Reply
Pranjal Wagh September 28, 2022 - 12:43 AM

मनःपूर्वक धन्यवाद!! सरू मामा इज ग्रेट! 😀

Reply
Bharati Pai September 27, 2022 - 8:13 AM

Surekh likhaan ,..
Jasa kahi me hi hote tumchya barobar trekvar asa vachtana anubhav ala

Reply
Pranjal Wagh September 28, 2022 - 12:43 AM

Thank you!! Glad I could make it happen! 😀

Reply
Meeta Meher September 27, 2022 - 8:49 AM

खूप ओघवतं लिहिलंय ????relived the day???? ????????

Reply
Pranjal Wagh September 28, 2022 - 12:42 AM

Thanks a lot!! 😀 I am glad you liked it!

Reply
Esha Rajput September 27, 2022 - 9:50 AM

Masta ha Pranjal! Detailed description of the entire trek! Khupach chaan!

Reply
Pranjal Wagh September 28, 2022 - 12:42 AM

Thank you so much!! Will try to visit that area in Sept-Oct to get better photos!!

Reply
Kailash Dhumal October 5, 2022 - 12:36 AM

आई शप्पथ काय वातावरण होतं त्या दिवशी. इतकं फ्रेश वातावरण कितीतरी दिवसांनी अनुभवलं. Freshest ऑफ फ्रेश एअर बऱ्याच दिवसांनी मिळाली ???????????? लंग्ज सेड थँक्यू

Reply
Pranjal Wagh October 6, 2022 - 2:16 AM

येस! भारी वातावरण होतं! तुम्ही भेटला असता तर आणखी मजा आली असती!!

Reply
Balasaheb More April 15, 2023 - 9:17 AM

Very nice and informative

Reply
Pranjal Wagh April 18, 2023 - 1:04 AM

Thank you!

Reply
Sambhaji Chopdekar May 31, 2023 - 5:15 PM

Wonderful blog with extremely beautiful pictures!

Reply
Pranjal Wagh May 31, 2023 - 8:54 PM

Thank you Sambha!! <3

Reply
Ishwar Gaikwad June 1, 2023 - 8:46 PM

कुमशेत गाव तसं टुमदार नि परिसरही दमदार, मात्र, केवळ हा ट्रेक मात्र, खरं तर, ब्लॉग लिहिण्याइतपत ‘दमदार’ नाही आणि एवढाच ट्रेक करण्यातही काही ‘दम’ नाही; हे म्हणजे महाबळेश्वर-माथेरानला जाऊन एखादाच पॉईंट करण्यासारखं! असो. हा टोमणा नाही, तर, कृपया, हे निरीक्षण समज. पण, तरीही तु प्रयत्न केलास, त्याबद्दल तुझं कौतुक! ओघवतं लिहितोस तु, छान! इथं, इथं उन्हाळ्यात, कुमशेतच्या बाजूने चढता-उतरताना मात्र बऱ्यापैकी तंतरते.. कुमशेतचं नाव जरी निघालं तरी हे आठवतंच. असो. लिहित रहा. थांबलं की थांबतं ते म्हणून म्हणलं. गोड शुभेच्छा!
????????

Reply
Pranjal Wagh June 1, 2023 - 10:41 PM

आमचा कात्राबाईचा ट्रेक तसा पावसामुळे फसलाच! ढगांचे आणि फुलांचे फोटो काढणे राहूनच गेले!पण एकंदर पावसाळी अनुभव सुखद होता म्हणून या ब्लॉगचे प्रयोजन! कात्राबाई, मुडा, गवळदेव, रतनगड हा सगळा परिसर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा करायचा आहे! 😀 तेव्हा तो अधिक दमदार होईल यात शंका नाही!

Reply
Krupali August 15, 2024 - 1:06 PM

Pranjal ..i read ur blogs regularly…your writing amazing it feels doing trek with you…. I would like to do trek with you but ghatwata
..which explore life jungle,nature , social life of guide…Nature always speaks with us during ghatwata..it teaches so many things …keep it up all d best

Reply
Pranjal Wagh September 15, 2024 - 12:11 PM

Thank you so much Krupali for the kind words!! They mean a lot to me!! If there is a chance then definitely would do a Ghatwat trek with you!!

Reply

Leave a Reply to Krupali

You may also like