सफर ब्रह्मगिरीच्या दुर्ग्द्वयीची – त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग!

by Pranjal Wagh
321 views
पहाटेची उन्हं आपल्या लख्ख तेजाने ब्रह्मगीरीस न्हाऊ घालीत होती.

(हा लेख ०२ सप्टेंबर २०१९ रोजी साप्ताहिक सकाळमध्ये प्रकाशित झालेला आहे)

पहाटे ४ च्या सुमारास बंद डोळ्यांवर बस मधल्या दिव्यांचा प्रखर प्रकाश पडला आणि माझी साखर झोप मोडली गेली. आपसूकच “काय शिंची कटकट आहे!” असे भाव चेहऱ्यावर झळकले. हवीहवीशी वाटणारी साखर झोपेची मिठी कशीबशी सोडवत, फक्त दावा डोळा किलकिला करून मी बस कंडक्टरला त्रासिकपणे विचारले, “मास्तर, कुठला stop आहे?”
“शेवटचा stop! त्र्यंबकेश्वर! चला उतरून घ्या!”, मास्तर निर्वाणीचा इशारा देऊन खाली उतरले!

लहानपणी शाळेत जाण्यासाठी पहाटे उठताना ज्या यातना होत असत त्यांचीच प्रचीती मला आली आणि मी मोठ्या कष्टाने समान घेऊन उतरलो. सप्टेंबर महिना असल्यामुळे हवेत गारवा होताच. थंडगार वारं पण सुसाट सुटल होतं. एक बोचरी झुळूक अंगाला चाटून जाताच पाठीचा कणा शहरला आणि उरल्यासुरल्या झोपेला पळवून लावले! मग तोंडावर पाणी मारून, थोडा ताजातवाना होऊन सभोवताली नजर फिरवली. अख्खा डेपो झोपी गेला होता. रात्रभर भुंकून थैमान घालणारी कुत्री सुद्धा जरा विश्रांती घेत पहुडली होती. डेपोमागील काळ्या आकाशात जरा कुठे उजाडू लागलं होतं. त्या अंधुकश्या प्रकाशात नजरेत सहज भरून येत होतं तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळे त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी एक भीतीयुक्त आदराची भावना निर्माण झाली. कैक सहस्त्र वर्षांपासून तप करीत असलेला जणू एखादा साधुपुरुषच! बेफाट सुटलेल्या वार्यामुळे पावसाचे ढग त्याच्या माथ्यावर आदळत होते, विखुरले जात होते! जणू शेकडो मेघदूत त्या पर्वतऋषींशी संदेशांची देवाणघेवाण करीत असवते! असा हा ब्रह्मगिरी पर्वतऋषी आपल्या माथ्यावर त्र्यंबकगडाचा मुकुट मिरवत, त्र्यंबकेश्वरास आपल्या कुशीचे अभेद्य संरक्षण देत युगानुयुगे अचल उभा आहे!

तसा हा माझा पहिलाच सोलो ट्रेक. निघण्यापूर्वी हवी ती खबरदारी घेतलेली होती. प्रथमोपचार सामग्री, एक छोटी रोप स्लिंग, कॅराबिनर सोबत ठेवले होतेच. शिवाय त्र्यंबकेश्वर येथील पोलीस चौकीचा दूरध्वनी क्रमांक, अपघात झाल्यास रेस्क्यू helpline – या सगळ्यांची माहिती घरी दिलेली होती. शिवाय पाणी आणि खाण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात होते. सरतेशेवटी परिसराची माहिती, गुगलवरून रेकी, किल्ल्याबद्दल पुस्तकात अथवा ब्लॉग्स वरून सविस्तर माहिती फोटो सहित अभ्यासली होती. तरीही सोलो ट्रेक असल्यामुळे मनात थोडी कालवाकालव होत होती.

गडावर माकडांपासून धोका आहे असे कळताच काळजात चर्र झालं! माकडांची आणि माझी मोठी दुष्मनी! अंकाई-टंकाई किल्ल्यावर अशाच एका माकडाच्या टोळीने हल्लकल्लोळ करून आम्हाला टंकाई किल्ल्यात प्रवेश करू दिला नव्हता. त्या वेळी ट्रेकवर आम्ही दोघ मित्र होतो! इथे मी एकटा होतो! आता जे होईल ते होईल असे मनात म्हटले!
सहज म्हणून डोंगराकडे नजर टाकली तर थोडे उजाडले होते पण ढगांनी किल्ल्यावर एकच दाटी केली होती! अशा परिस्थितीत किल्ल्यावर जाऊन पावसाचा मारा सोसावा असता किवा धुक्यात हरवून दिशाभूलही झाली असती! गडाचा माथा माझ्या परिचयाचा नव्हता, जमीन पायाखालची नव्हती. त्यात डोंगर अजस्त्र! वर हरवलो तर सापडायला दोन दिवस लागतील इतका प्रचंड पर्वत! टपरीवर चहा सांगून वातावरण अनुकूल होण्याची वाट बघत बसलो!

३-४ कडक चहा पिऊन माझी “कडक तपश्चर्या” झाल्यावर ब्रह्मगिरी प्रसन्न झाला. ढगांचे आवरण झुगारून देऊन, पहाटेच्या मवाळ उजेडात दर्शन देत आम्हासमोर उभा राहिला! आपले पुष्ट बाहू पसरून मला भेटीला येण्याचे आवाहन करून लागला! सूर्योदयाची चाहूल लागली होतीच! त्र्यंबकगडाच्या आणि खासकरून भांडारदुर्गच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देई ना! मग लागलीच आवरते घेतले आणि निघालो! चढाईची वाट तशी बांधलेली असल्यामुळे कसलाच त्रास नाही खरंतर! झपाझप पावले टाकीत मी अंतर कापू लागलो!हातात कॅमेरा पारजत जशी मी वाट चढू लागलो तसा सूर्यवर येऊ लागला! लक्षावधी सूर्यकिरणे उधळीत, ढगांना पिटाळून लावीत मला गगनराज भास्कराचे दर्शन झाले! पहाटेची उन्हं आपल्या लख्ख तेजाने ब्रह्मगीरीस न्हाऊ घालीत होती. त्याच्या अंगा-खांद्यावर नागमोडी वळणं खेळणाऱ्या असंख्य जलधारा सूर्यप्रकाशात लकाकत होत्या. आखाड्यातून व्यायाम करून नुकत्याच निघालेल्या, तेला-मातीने माखलेल्या एखाद्या मल्लासारखा तो रुबाबात उन्हं खात उभा होता!

पहाटेची उन्हं आपल्या लख्ख तेजाने ब्रह्मगीरीस न्हाऊ घालीत होती.

पहाटेची उन्हं आपल्या लख्ख तेजाने ब्रह्मगीरीस न्हाऊ घालीत होती.

ब्रह्मगिरीच्या परिसराला नाथ संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे! नाथ संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांचा वावर इथे झालेला आहे! याच डोंगरातील एका गुहेत गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना संपूर्ण आत्मज्ञान दिले! पुढे हेच ज्ञान निवृत्तीनाथांनी गुरु ह्या नात्याने ज्ञानेश्वर माउलींना देऊन नाथसंप्रदायाची थोर परंपरा पुढे चालवली! अशा या संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे!

एव्हाना गडाच्या कातळ कोरीव पायर्या सुरु झाल्या होत्या. कातळ पोखरून बनवलेल्या या चिंचोळ्या रस्त्याच्या कडेला जकातवसुलीसाठी बसल्याप्रमाणे माकडांची टोळी होती. किल्ल्यावर एव्हाना मी एकटाच होतो. निदान मागे अर्धा किलोमीटर कोणीही नव्हते त्यामुळे आता या टोळक्याचा सामना मला एकट्याला करावा लागणार होता! गपगुमान कॅमेरा bag मध्ये ठेवून दिला, नजर खाली रस्त्याकडे ठेवून, walking स्टिक आपटत, माकडांकडे दुर्लक्ष केल्याच्या अविरभावात निघालो! वास्तविक एक डोळा माकडांवर होताच पण आश्चर्य म्हणजे माकडांनी मला काहीच केले नही आणि त्यांच्या वेढ्यातून सहीसलामत मी निसटलो! वास्तविक जो पर्यंत तुम्ही माकडांची छेड काढीत नाही तो पर्यंत ते तुमच्या वाट्याला जात नाहीत. पण आपल्याकडचे पर्यटक माकडांना चिडवतात, चित्र-विचित्र आवाज न हावभाव करतात, त्यांना खारट-गोड-तिखट पदार्थ खायला देतात. माकडांना चटक लागली की ते तुमच्या हातातून गोष्टी खेचून घेतात आणि तुम्ही विरोध केला की तुम्हाला चावतात-बोचकारतात! मुकी जनावरं ती! त्यांच्या नैसर्गिक गुणानुसार वागतात! त्यांना अरबट-चरबट खायला घालून, त्यांची छेड काढून आपणच त्यांना त्रास देत असतो!

ही पायऱ्यांची खोदीव वाट म्हणजे त्र्यंबकगडाचा राजमार्ग! या मार्गावर दगडात कोरून काढलेले दरवाजे लागतात. अनामिक कारागिरांनी छिन्नीचे असंख्य घाव घालून बनवलेला हा राजमार्ग, हे कोरीव दरवाजे, या कातळातील गुंफा, गडावरील अत्यावश्यक असलेली खोदीव पाण्याची टाकी म्हणजे सह्याद्रीच्या पाषाणात निर्मिलेली एक अजरामर वास्तुशास्त्रीय कलाकृतीच होय! साधारण किल्ल्याचे असे बांधकाम असले की किल्ला सहज ८००-१००० वर्षे जुना आहे असे समजायचे! त्या अंदाजाने त्र्यंबकगड नक्कीच सहस्त्र वर्षे जुना किल्ला असला पाहिजे! त्र्यंबकगड हा देवगिरीच्या रामदेवराय याच्या कारकिर्दीत बांधला जाण्याची शक्यता वर्तवता येते. वास्तविक ब्रह्मगिरीच्या माथ्यावर वसलेले त्र्यंबकगड आणि भंडारदुर्ग हे वेगळे नसून एकाच किल्ल्याचे दोन भाग आहेत. त्यातील त्र्यंबकगड हा मुख्य किल्ला आणि भांडारदुर्ग हा त्याचा जोडकिल्ला! शत्रूचे आक्रमण होता मुख्य किल्ला पडला तर पळून जाण्यासाठी किवा रसद सुरु ठेवण्यासाठी भांडारदुर्गाचा उपयोग होत असावा!

त्र्यंबकगडाचा कातळकोरीव दरवाजा

त्र्यंबकगडाचा कातळकोरीव दरवाजा (छायाचित्र – अजय काकडे)


एव्हाना पायऱ्या चढून मी गडात प्रवेश केला होता. वर जाताच माझं स्वागत केलं ते घोंघावणाऱ्या वाऱ्याने, ढगांनी आणि अर्थात पोटामाधल्या कावळ्यांनी! एक मोकळी ओसरी पाहून न्याहारी आटपली आणि सोबत आणलेल्या नकाशाच्या आधारे गोदावरी मंदिर शोधात निघालो! गोदावरी नदी म्हणजे दक्षिणगंगा! गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर आहे! गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. त्या जटा जिथे आपटल्या त्या जागी किल्ल्यावर आज जटा मंदिर आहे आणि किल्ल्याच्या दक्षिणेस गोदावरी उगमस्थान आहे! अशीही पावन दक्षिणगंगा या ब्रह्मगिरी पर्वतावर अवतरली!

धुक्यातून वाट काढीत, चाचपडत अंदाज घेत मी गोदावरी उगमस्थान गाठले! गोदावरी नदी इथे उगम पावते आणि लगेच गुप्त होऊन डोंगराच्या पायथ्याला गंगाद्वारी प्रकट होते! तिथे एक गुरव काही भाविकांना पूजा सांगत बसला होता. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांच्या मूर्तींची आणि गोदावरीची पूजा सुरु होती. त्यांची पूजा होताच त्यांच्याकडून किल्ल्याच्या पडक्या हत्ती दरवाजाची माहिती काढून घेतली आणि मोर्चा तिथे वळवला! एक व्यवस्थित मळलेली, रुळलेली वाट सुमारे अर्धा तासाच्या चालीनंतर आपल्याला उभा करते पडक्या दरवाज्य समोर. वास्तविक हा खचलेला आणि पडलेला दरवाजा उक्त सुंदर आहे आणि इतका शिल्पांनी संपन्न आहे की जर उत्खनन केले तर आजू बरेच अवशेष तर सापडतीलच पण एक वास्तू मोकळा श्वास घेऊ शकेल! दरवाजा पाहून पावलं माग फिरून थेट चालू लागली गोदावरी उगम्स्थानाकडे. आता वेध लागलेले जटा मंदिर आणि त्या पुढील तो गुढरम्य असा भंडारदुर्ग (दुर्ग भांडार) पाहण्याचे!

उद्ध्वस्त आणि मुजलेला दरवाजा!

उद्ध्वस्त आणि मुजलेला दरवाजा!

झपझप पावले उचलीत मी सुमारे अर्ध्या तासात ते विस्तीर्ण असं पठार पायाखाली घातलं. गडाच्या पश्चिमेकडील बाजू म्हणजे उभा ताशीव कडा! या बाजूने कोणी शत्रू चुकून सुद्धा वर यायचा नही इतके उभे सरळसोट कडे! पलीकडे दूर ढगात लपलेला हरिहर उर्फ हर्षगड, ब्रह्म्या आणि भास्करगड क्षितिजावर ठळकपाने उठून दिसत होते! इतक्या वेळात ढगांची दुलई पांघरून गड गाढ झोपला होतं पण आता त्या शुभ्र आकाशातून छोटे-छोटे निळे कवडसे डोकावत होते. जटा मंदिराची छोटीशी पण सुबक वस्तू नजरेत येऊ लागताच अचानक सोसाट्याचा वारा सुटला, पांढऱ्या ढगांची पांगापांग झाली, गर्द निळे आसमंत दिसू लागले, आणि उन्हाच्या तीरीपेने ब्रह्मगीरीचे लुप्त झालेले शिखर उजळून निघाले! कुरुक्षेत्री जगत्गुरू श्रीकृष्णाने आपले विराटरूप पार्थास दाखवले तेव्हा त्याची जशी गत झाली होती तशी काहीशी माझी अवस्था झाली! त्या विराटरूपापुढे मनुष्याचे अस्तित्व किती नगण्य आहे याची फिरून पुन्हा जाणीव झाली!

ब्रह्मगिरीचं शिखर!

ब्रह्मगिरीचं शिखर!

जटा मंदिरातील शंकरास नमस्कार करून आता पुढे निघायचे होते. मंदिर आणि एका पाण्याच्या टाक्यामधून जाणारी पायवाट धरली आणि वाढलेल्या गवतातून गडाच्या उत्तरेकडे निघालो! ब्रह्मगिरीच्या उत्तरेकडे एक एकलकोंडा किल्ला अथवा जोडकिल्ला आहे! प्राचीन दुर्गस्थापत्यशास्त्राचा मूर्तिमंत अविष्कार! निसर्गाशी एकरूप होऊन वास्तुनिर्मिती करतानाच किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्व कसे टिकवून ठेवायचे याचे उत्तम उदाहरण! पावसाळ्यातील वर्षावाने गड पुरता हिरवा झाला होता! पण अचानक चालता चालता रंग पालटू लागले. हिरव्याकंच शालूच्या पदरावर जांभळी गर्द वेलबुट्टी उमटू लागली! आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालण्याची वेळ आली! माझ्यासमोर जांभळा गालीचा जणू अंथरला होता! सात वर्षातून एकदा फुलणारी कारवी वनस्पती नेमकी मी किल्ल्यावर आलो असताना बहरली होती! इतकंच नव्हे तर या जांभळ्या फुलांकडे पाहण्यात गर्क असताना समोर ढगांचा पडदा बाजूला सरला गेला आणि भांडारदुर्गाने दर्शन दिले! दुग्धशर्करा योग म्हणावा तो हाच असणार!!

कारवीने नटलेला ब्रम्हगिरी!

कारवीने नटलेला ब्रम्हगिरी!

भंडारदुर्ग किवा दुर्ग भांडार!

भंडारदुर्ग किवा दुर्ग भांडार!

दुर्ग भांडारच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या!

दुर्ग भांडारच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या! (छायाचित्र – अजय काकडे)

भांडारदुर्गाचे वैशिष्ट्य असे की तो एक नैसर्गिक बुरुज आहे व मुख्य ब्रह्मगिरी आणि त्यामधील एकमेव दुवा म्हणजे त्या दोघांमधील अरुंद नैसर्गिक दगडी सेतू! शत्रूचे आक्रमण जरी झाले तरी मोजक्या शिबंदिनिशी लढवता येईल असं छोटेखानी जोडकिल्ला! पण या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य असे की याचे प्रवेशद्वार अजिबात दिसत नाही! चालता चालता डोंगर संपून जाईल असं वाटायला लागतं आणि आपण पावलं साशंकपणे टाकतो इतक्यात उभे ठाकते ते कातळात उभे खोदलेले किल्ल्याचे द्वार! डोंगराच्या पोटात उभा कातळ लोण्यासारखा कोरून जवळजवळ ४० पायर्या आहेत! या पायर्या उतरून खाली गेल्यावर एक छोटे द्वार येते – बहुदा ते बुजले असावे अथवा उत्खनन केल्यावर ते एक पुरुष उंचीचे सहज असेल असे वाटते! इथून बाहेर पडल्यावर आपण त्या दगडी पुलावर येतो! हा नैसर्गिक दगडी पूल म्हणजे २०० फूट उभी कातळ भिंत! इथून खाली वाकून पाहिलं तर डोळे फिरतात! उजवीकडे गंगाद्वार आणि त्र्यंबकेश्वर तर डावीकडे किल्ल्यांनी नटलेला संपन्न असा विस्तीर्ण डोंगराळ परिसर! हा पूल ओलांडून पुढे गेलो की डावीकडे एक छोटं – अगदी जमिनी पासून २ फूट उंचीचं द्वार दिसतं! इथून सरपटतच आत जावं लागतं! आत गेल्यावर विस्फारलेल्या नेत्रांनी आपण हा स्थापत्यशास्त्राचा नमुना पाहत बसतो! या बाजूसही कातळ खोदून वर चढणाऱ्या सुमारे ४० पायऱ्या आपल्याला गडावर घेऊन जातात!

दुर्ग भांडारवरून दिसणारा त्र्यंबकगड!

दुर्ग भांडारवरून दिसणारा त्र्यंबकगड!

दुर्ग भांडारवरील पाण्याची टाकी

दुर्ग भांडारवरील पाण्याची टाकी

दुर्ग भांडारचा कातळात खोदलेला टेहळणी बुरुज!

दुर्ग भांडारचा कातळात खोदलेला टेहळणी बुरुज!


गडावर पाहायला फारसे अवशेष नाहीत. स्फटिकासारख स्वच्छ पाणी असलेली दोन टाकी आहेत आणि गडाच्या उत्तर बाजूस एक दगडात खोडून काढलेला पाषाण बुरुज आहे! टेहळणीसाठी बांधलेला हा बुरुज त्र्यंबकेश्वर आणि त्याच्या उत्तरेच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जाई! किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही पण त्र्यंबकगडासोबत शिवाजी महराजांनी हा किल्लादेखील १६७० मध्ये स्वराज्यात आणला!

बुरुजावरील थंड वाऱ्याने आणि समोरील विहंगम दृश्याने मला तिथेच खिळवून ठेवले होते! पण घड्याळाचे काटे निघण्याचा इशारा देत होते. नाईलाजाने काढता पाय घ्यावा लागला. या रुबाबदार गडपुरुषाचा निरोप घेत पावले परत वाळू लागली गड पायथ्याकडे पण पुन्हा इथे येण्याचे स्वतःला वचन देऊनच!

-प्रांजल वाघ
२ सप्टेंबर २०१९
(संदर्भ – “त्र्यंबकगड –अंजनेरी – रामशेज” -श्री महेश तेंडूलकर

विशेष आभार : अजय काकडे
छायाचित्र साभार : प्रांजल वाघ, अजय काकडे)

6 comments

Anirudha Limaye October 23, 2020 - 11:11 AM

मस्त लिहलयस वाघ्या, पुन्हा लिहायला सुरवात केलीस हे पाहुन छान वाटल आणि आता त्याचाबरोबर कमाल फोटो पण.

Reply
Pranjal Wagh October 23, 2020 - 12:30 PM

थँक यू! लिखाण तसं सुरूच आहे पण वेळेअभावी असून बसते!! मी नक्कीच लिहीत राहीन!

Reply
मकरंद करकरे October 23, 2020 - 7:44 PM

सुरेख वर्णन प्रांजल. तुझ्या बरोबर हिंडल्यासारखं वाटलं. खूप छान.

Reply
Pranjal Wagh October 23, 2020 - 10:51 PM

धन्यवाद काका!! जाऊया मग कधीतरी हिंडायला! 😀

Reply
Digamber April 8, 2022 - 10:16 AM

सर तुमचे अप्रतिम लेखन आहे, जणू काय ब्रम्हगिरी गडपुरूष समोर पाहतोय असा भास होतो.

Reply
Pranjal Wagh May 23, 2022 - 2:46 PM

नमस्कार!!

आपल्या कमेंटसाठी मी शतशः आभारी आहे!
मी काही मोठा लेखक नाही, जे काही पाहिलं ते शब्दात उतरवायचा आपला छोटासा प्रयत्न! आपल्याला आवडला यांतच सगळं आलं !!

Reply

Leave a Comment

You may also like