शिवरायांची जलनीती

शून्यातून नूतन सृष्टी निर्माण करणाऱ्या दुर्गपती शिवरायांची जलनीती!

by Pranjal Wagh
407 views
शिवरायांची जलनीती

भारताचे जलपुरूष मानले जाणारे श्री राजेंद्र सिंह म्हणतात, “तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी लढले जाईल!”. या एका वाक्यावरून पाण्याचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित होते. पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवन अशक्य आहे आणि मानवीय जीवन नष्ट झालं तर मनुष्य संस्कृती कशी टिकून राहील? त्यामुळे, पाणी हेच जीवन आहे!

आपल्या पूर्वजांनी हे सत्य केव्हाच जाणले होते. शिवराय हे जरी भारताच्या इतिहासातील शेवटचे आणि कदाचित सर्वात कुशल असे दुर्ग निर्माते असले तरी दुर्ग निर्मितीचे तंत्र भारतीयांना पुराणकाळापासून ज्ञात आहे. ऋग्वेदातील ऋचांमध्ये “पुरं” म्हणजे तटबंदी युक्त शहरांचा उल्लेख आढळतो आणि असुरांच्या पुरांचा विनाश करणाऱ्या “इंद्राला”, ‘पुरंदर – पुरांचा विनाश करणारा’, ‘पुरांदर्भ – पुरांचा भेद करणारा’ असे संबोधले गेले आहे. याचा अर्थ दुर्गांचे अस्तित्व त्या काळीदेखील होते. पण या ही पुढे जाऊन अनके ऋचांमध्ये “असुरांनी आमचे पाणी रोखून धरले आहे, तू ते बांध फोड आणि आमचे पाणी मोकळे कर” इंद्राला केलेली अशी प्रार्थना आढळते. हा साधारण हिमयुग सुरु होण्याचा/ सरस्वती नदी आटण्याचा काल असावा. यावरून मनुष्य जीवनात पाण्याचे महत्व तेव्हाही होते आणि आता ही आहे हे आपल्या लक्षात येते!

इ.स. १६३० च्या सुमारास महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. हा दुष्काळ इतका भयानक होता की बादशाहनाम्यात त्यावेळच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे – “ …भाकरीच्या तुकड्यासाठी लोकं स्वतःला विकून घ्यायला तयार होते. पण विकत घेणारा कुणीच नव्हता….माणसे माणसाला खाऊ लागली…पुत्रप्रेमापेक्षा पित्याला मुलाचे मांस अधिक प्रिय वाटू लागले…” एक तर सुलतानी राजवट आणि त्यात हा भयंकर असा “थोरला दुष्काळ”, हे एकत्र आल्याने महाराष्ट्र जनजीवन उध्वस्त झाले. आणि याचं वर्षी म्हणजे इ.स. १६३० मध्ये शिवरायांचा जन्म झाला!

आदिलशाहीच्या मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवलेल्या, उध्वस्त पुण्याची जहागिरी शिवबांकडे आली आणि जिजाउंसोबत पुण्यात आलेल्या शिवबांना स्वराज्याचे बाळकडू पाजले जाऊ लागले. १६३०चा थोरला दुष्काळ आणि त्या परिस्थितीत जनतेची देखभाल कशी करावी, उजाड पुण्याचं पुनर्वसन कसं करावं हे आपल्या सल्लागारांसोबत ते पाहत होते, शिकत होते. या साऱ्यामध्ये पाण्याला आणि जल-व्यवस्थापनाला असलेलं अनन्यसाधारण महत्व त्यांच्या लक्षात आलं असलं पाहिजे. बलाढ्य आदिलशाही (आणि नंतर शक्तिशाली मोगल) यांच्या विरुद्ध बंड पुकारून स्वराज्य निर्माण करायचे आणि ते ही तोकड्या शिबंदिनिशी, मोजक्या द्रव्यानिशी! आदिलशाही सैन्याचा लोंढा अंगावर चालून आला तर त्यांच्यासमोर मोकळ्या मैदानात निभाव लागणे कठीण! म्हणून मग सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेल्या बेलाग दुर्गांचा आश्रय घ्यायचा आणि याचं दुर्गांच्या संरक्षणाखाली स्वराज्याचा राज्यकारभार चालवायचा! अशा प्रकारे शिवरायांच्या द्रष्टेपणामुळे स्वराज्यात, दुर्ग ही सत्ताकेंद्रे झाली!

‘कामंदकीय नीतिसार’ या ग्रंथात दुर्ग स्थापत्य कसं असावं, दुर्गांवर काय काय असले म्हणजे तो सर्वोत्तम मानवा याबदल काही श्लोक आहेत. त्यातलाच हा,

पण दुर्गावर जर “जल” नसेल तर इतर सर्व गोष्टी नगण्यच ठरतात! त्यामुळे या सर्व घटकांमध्ये दुर्गांवरचे जल सर्वात महत्वाचे ठरते ! कौटिल्य आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात दुर्गानिर्मितीवर चक्क २ प्रकरण लिहितो आणि त्यात पाण्याचे महत्व अधोरेखित करतो!

शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे! शिवरायांनी वाचले असतील का ते ग्रंथ? याचे उत्तर फक्त काळच जाणे! पण शिवरायांनी दुर्गांसोबत पाण्याला किती महत्व दिले हे समजायचे असल्यास हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेला “आज्ञापत्र” हा ग्रंथ वाचणे गरजेचे आहे!

हुकुमतपानाह रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र
हुकुमतपानाह रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र

मराठयांच्या ५ छत्रपतींच्या कारकिर्दी जवळून पाहिलेला हा असामान्य अमात्य, याने शिवरायांच्या मनातली दुर्गनीती अचूक हेरली आणि कागदावर उतरवून “आज्ञापत्र” या ग्रंथाची निर्मिती केली! “राज्याचे सार ते दुर्ग!’ असं म्हणणारे पंत अमात्य आपल्या या ग्रंथातून शिवछत्रपतींच्या लेखी दुर्गांवरील पाणी आणि त्याच्या’ व्यवस्थापनाबद्दल काय धारणा होती हे सांगतात.

“गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बंधने प्राप्त जाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबूद बांधावी. गडावरी झराही आहे, जैसे तैसे पाणीही पुरते म्हणोन तीत्कीयावरी निश्चिती न मानता उद्योग करावा किंनिमित्त्य की, जुझामध्ये भांडीयांचे आवाजाखाली झरे स्वल्प होताती आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो तेंव्हा संकट पडते याकरिता तैसे जागा जखीरीयाचे पाणी म्हणोन दोन चार तळी बांधून ठेऊन त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे”

थोडक्यात दुर्ग बांधायचा असेल तर पाणी हे सर्वात अवश्य. गडावर शिबंदी, दारूगोळा, धन-धान्य हे सर्व भरपूर जरी असले पण पाण्याचा अपूर्ण साठा असेल तर गड भांडू शकत नाही! किती ही बेलाग आणि दुर्गम दुर्ग असला तरीही पाणी नसल्यावर तो कमकुवत होऊन युद्धाच्या प्रसंगी शत्रूच्या हातात पडतो! अमात्य म्हणतात गडावर जरी पाण्याचे नैसर्गिक झरे मुबलक असले म्हणून निवांत न बसता  तिथे खडक फोडून पाण्याच्या टाक्या बांधून काढाव्यात. युद्धप्रसंगी तोफा धडाडू लागल्या की त्या दणक्याने जमिनीखालचे पाण्याचे झरे आपला प्रवाह बदलतात, गुप्त होतात! अशा वेळी नैसर्गिक रित्या साठवलं गेलेलं पाणी संपुष्टात येते. त्यामुळे दुर्गांवर राखीव पाणी असायला हवं आणि म्हणून या टाक्यांचं  प्रयोजन! याला जखीरीयाचे पाणी म्हणतात. हे राखीव असते आणि नैसर्गिक पाणी संपुष्टात येईपर्यंत हे वापरले जात नसे! साचलेल्या पाण्याची टाकी झाकून ठेवली जावी. त्यात कचरा, पालापाचोळा, प्राणी पडू नयेत याची काळजी घ्यावी असे आज्ञापत्र सांगते. शिवाजी राजांचं जलविषयक सूत्रच रामचंद्रपंतांनी आज्ञापत्रात लिहून ठेवलंय!   

महाराष्ट्रातील अनेक दुर्गांवर खडकात कोरलेल्या टाक्यांच्या शृंखला आहेत! सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट यांच्या राजवटीत यातील बहुतांश टाक्यांची निर्मिती केली असली तरी शिवरायांनी त्यांचे महत्व ओळखले होते! महाराष्ट्रातील ज्या ज्या गडांवर खोदलेली टाकी आहेत ते दुर्ग प्राचीन आहेत, शिवपूर्वकालीन आहेत! तरी देखील शिवरायांनी त्या दुर्गांवरील जल स्थापत्य नुसत जपलंच नाही तर नवीन टाकी बांधून, बंधारे बांधून त्या प्राचीन व्यवस्थेस बळकटी दिली.

याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे खुद्द छत्रपती शिवरायांची राजधानी – दुर्गदुर्गेश्वर रायगड! छत्रपतींनी राजधानीसाठी रायगड नक्की केल्यावर रायरीच्या डोंगरावर इमारती बांधायच्या आज्ञा सुटल्या. कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यांना १६७१-७२ मध्ये रायगडावरील इमारतींसाठी ५०००० होनांची रक्कम दिली गेली. त्या पैकी २०००० होन म्हणजे ४०% होन हे गडावरील जलव्यवस्थेसाठी राखून ठेवले होते! राजधानीच्या दुर्गाच्या बांधणीसाठी दिलेल्या रकमेतील इतका मोठा भाग फक्त पाण्याची व्यवस्था लावण्यात राखून ठेवण्यात आला यावरून छत्रपतींच्या लेखी जलव्यवस्थापन हे किती महत्वाचे होते हे अधोरेखित होते!

शिवरायांची जलनीती : ३०० वर्षानंतर देखील सगळ्या गडाची तहान भागवणारा गंगासागर!
३०० वर्षानंतर देखील सगळ्या गडाची तहान भागवणारा गंगासागर!

शिवकालीन जलव्यवस्थापनाची दोन उत्तम उदाहरणं रायगडावर आपल्याला आढळतात. एक म्हणजे कुशावर्त तलावाजवळील वाड्याच्या बाहेर एक कुंड आहे. त्यावर पूर्वी दगडी जाळी होती. ती जाळी  कुणीतरी उखडून नेली. या जाळीतून पाणी गाळले जाऊन शेजारच्या कुंडात जातं आणि तिथून जवळच असलेल्या जलमंदिरात उतरतं. तिथून पूणर्पणे भूमिगत अशा मार्गाने कुशावर्त तलावात साचत! बालेकिल्ला व आजूबाजूला पडणारे पावसाचे पाणी हे सारे वाहून कुशावर्तात येते ते या भूमिगत मार्गाने! दुसरं उदाहरण म्हणजे शिवछत्रपतींचा राजवाडा येथील पाण्याचा विसर्ग होण्याची व्यवस्था पूर्णपणे भूमिगत आहे. तसेच रायगडावर असलेले शौचकूप आणि तेथील मलमूत्राचा निचरा हा देखील भूमिगतच आहे. पाण्याची साठवण, पाण्याचा विसर्ग आणि मलमूत्राचा निचरा या सगळ्या गोष्टींना महाराजांच्या जलनीतीमध्ये किती महत्व होते हे स्पष्ट दिसून येते!

शिवरायांची जलनीती : हत्ती तलाव! २००९ मध्ये रिकामा असणारा तलाव आता भरलेला असतो!
हत्ती तलाव! २००९ मध्ये रिकामा असणारा तलाव आता भरलेला असतो!

दुर्ग हे शिवकाळात “सत्ताकेंद्र” म्हणून उदयास आले. हे सत्ताकेंद्र उभं करताना देखील पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे! दुर्गाचे बांधकाम, बांधकाम करणारे कामगार या साऱ्यांना पाणी लागे. पण मग हे पाणी डोंगरावर चढवायचे कसे? त्यापेक्षा दुग्राचे स्थान निश्चित झाले की तिथल्या डोंगरावर (अथवा जलदुर्ग असल्यास बेटावर) जमीनीखालचे जिवंत झरे शोधले जात. सहाव्या शतकात वराहमिहिराने “बृहत्संहिता” नावाचा ग्रंथ लिहून काढला. त्यात जमिनीखालचे पाण्याचे अदृश्य झरे शोधून काढण्यावर एक प्रकरण आहे. आजूबाजूच्या परिसरात आढळणारे कीटक, वनस्पती, तेथील दगडांचा रंग इत्यादी बाबींचा अभ्यास करून पाण्याचे झरे कसे शिधून काढायचे याचे विस्तृत वर्णन वराहमिहिर करतो. ‘दकार्गलम्’ या प्रकरणात हे आपल्याला सापडते. तेच शास्त्र किवा तत्सम तंत्र वापरूनछ गडावरील पाण्याचे नैसर्गिक झरे शोधले जात असावेत. मग या झर्यांचे जलाशय निर्माण केले जात किवा खडकातील टाक्यांची साखळीच उभी केली जाई! गडाचे बांधकाम, मजुरांच्या नित्य वापरासाठी याचा वापर केला जाई. गडाचे बांधकाम पूर्ण झाले की हेच पाणी पुढे गडावरील शिबंदी, घरटी, कारागीर यांच्यासाठी वापरले जाई!

स्वराज्याची पहिली राजधानी अर्थात राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला बहुदा पहिला किल्ला. राजधानीचा दुर्ग म्हंटल्यावर तिथे पाण्याचा मुबलक साठा हवाच. राजगडावर तसा पठारी प्रदेश फार कमी. तरी सुध्दा राजगडावर पाण्याची कमतरता आढळत नाही. पद्मावती माचीवर पद्मावती मंदिर येथे नैसर्गिक स्रोत असलेली दोन टाकी आढळतात. इतकेच नव्हे तर पद्मावती माचीवरील १०० फुट लांब व ८० फुट रुंद असा पद्मावती तलाव, राजवाड्यामागील मोठा तलाव असा पाण्याचा मुबलक साठा या माचीवर आढळतो. तसेच सुवेळा माची, संजीवनी माची, काळेश्वरी बुरुज, मल्लिकार्जुन मंदिर येथे देखील जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आढळून येते. तसेच बालेकिल्ल्यावर चंद्रतळे जे 50 फुट लांब व १५ फुट रुंद आहे ते देखील नैसर्गिक पाण्याचे ठाणे आहे. बालेकिल्ल्यावर आणि काही छोटी-मोठी टाकी आढळतात. राजगडाचे वर्णन “एक दुर्ग चार किल्ले” असे केलेले आढळते. त्याच वर्णनाला न्याय देत येथील प्रत्येक माची आणि बालेकिल्ला पाण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आहे!

पद्मावती तलाव, पद्मावती माची, राजगड (२००६)
पद्मावती तलाव, पद्मावती माची, राजगड (२००६)

राजगडाच्या तुलेनेने रायगडचा विस्तार अधिक  असून येथे भरपूर प्रमाणात पठार आणि सपाटी आढळते. अभिषिक्त राजधानीचा रायगड म्हणजे जणू नंदादीपाच्या डोंगरावर शिवप्रभूंनी बांधलेली नगरीच! या नगर निर्मितीसाठी अनेक ठिकाणी कौटिल्याने सांगितलेल्या सिद्धांतांचा वापर केल्याचे आढळून येते. तसेच दुर्गांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवछत्रपतींनी इथे मुबलक पाणीसाठा करून ठेवला आहे. गंगासागर, हत्तीतलाव, कुशावर्त तलाव आणि तिथली भूमिगत जलव्यवस्था, कोळींब तलाव, बामण टाके, काळा हौद व हिरकणीचा तलाव हे सात पाण्याचे मोठे तलाव आढळतात. त्याशिवाय २६ लहान मोठी पाण्याची टाकी इथे आहेत. येथील पाणीसाठा आजही वापरला जातो आणि पूर्वी शिबंदी, कारभारी  व रहिवाशी यांची तहान भागवणारं पाणी आज येणाऱ्या पर्यटकांना पुरून उरते!उगीच नाही ‘अपुऱ्या शिबंदिनिशी हा दुर्ग अवघ्या जगाशी लढेल’ असं इंग्रजांनी लिहून ठेवलंय!

शिवराय म्हणजे द्रष्टा आणि जाणता राजा. आज न उद्या खासा आलमगीर दक्खनेत उतरेल आणि मोगलांच्या फौजेच्या लोंढ्यासमोर जर स्वराज्यातील गड तग धरू शकले नाहीत तर इथून निसटून जायला वाट हवी म्हणून दक्षिण दिगीविजय मोहिमेवर असताना त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. तिथली दुर्गरचना त्यांच्या पसंतीस न उतरल्यामुळे तेथील बांधकाम समूळ पाडून तिथे ३ बालेकिल्ले असलेला नवीन दुर्ग निर्माण केला. मदुराई येथील आंद्रे फ्रेअर या जेसुइट माणसाने शिवरायांनी किल्ला उत्कृष्ट बांधला आहे याचे वर्णन तर केलेच आहे पण खासकरून शिवरायांनी तिथे पाण्याचे साठे निर्माण केले हे लिहून ठेवले आहे. शिवरायांच्या जलनीतीचि प्रचीती जिंजी किल्ल्यावर पुन्हा येते!

दुर्ग ही संकल्पना योग्य रीतीने वापरून, त्यात एखाद्या शास्त्रज्ञासारखे नवीन शोध लावणं, तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत बदल करणे हे काम शिवरायांनी केले. जदुनाथ सरकार त्यांना – मध्ययुगीन भारताचा सर्वात महान स्थपती – असं संबोधतात. दुर्गाभोवती स्वराज्य निर्मिती करणाऱ्या या प्रजेच्या लाडक्या राजाने दुर्ग टिकवण्यात असलेलं पाण्याचं महत्व ओळखले होते आणि तसे अमलात आणून आपल्या दुर्गांवर पाण्याचा मुबलक साठा निर्माण केला. प्रजेवर आणि दुर्गांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दुर्गकारीण छत्रपतीने योग्य जलनीती निर्माण करून ती अनुसरली आणि शून्यातून नूतन सृष्टी निर्माण केली!

– प्रांजल वाघ
११ जून २०२४

Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris

(वरील लेख सकाळ बेळगांव वर्धानापनदिन विशेष अंकात ११ जून २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे)

संदर्भ :

  • डॉ जयसिंगराव पवार संपादित ‘हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य स्मृतिग्रंथ’ २०१९
  • डॉ मिलिंद पराडकर : दुर्गविधानम्, २०२०
  • डॉ मिलिंद पराडकर : प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या, राजगड व रायगड – एक तौलनिक अभ्यास, २०११

2 comments

शंकर बा सरकाळे February 19, 2025 - 8:37 PM

खूप छान लेख आहे जल सोर्सेस बाबत खूप चांगले
कार्य केलेले आहे

Reply
Pranjal Wagh February 22, 2025 - 3:14 AM

मनःपूर्वक आभार!!

Reply

Leave a Reply to शंकर बा सरकाळे

You may also like