पहाटे साडे पाचला पाचाडला एसटीतून उतरल्यावर आपली नजर समोरच उभ्या असलेल्या एका डोंगरावर खिळते. अंधुक प्रकाशातही त्याचं ते महाकाय रूप आपल्याला आकर्षित करत. आकाशात चढलेला तो डोंगर, त्याचे उभे काळेकभिन्न ताशीव कडे, दीड गाव उंच असलेला हा डोंगर समोर पाहता क्षणी ओळख पटते! छत्रपतींचे द्रष्टे बोल कानात घुमू लागतात – “तख्तास जागा हाच गड करावा!”
हाच तो! जिब्राल्टर ऑफ द ईस्ट! हिंदवी स्वराज्याची राजधानी!!
शिवतीर्थ रायगड!!!

रायगड ह्या किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास करायचा म्हटलं तर आयुष्य कमी पडायचं! इतका प्रचंड , इतका विचारपूर्वक बांधलेला किल्ला जगाच्या पाठीवर क्वचितच कुठे सापडेल! छत्रपतींच्या काळात रायगडावर साधारण १०,००० लोकांचा राबता असे! एक छोटं शहरच म्हणा हवं तर! त्यामुळे रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकर ह्यांना रायगड बांधताना शहरी नियोजन, स्थापत्यशास्त्र, संरक्षण आणि लष्करी नियोजन अशा अनेक आघाड्यांवर काम करावे लागले असणार ह्यात दुमत नाही!
पण आज आपण रायगड पाहणार नाही आहोत. आज आपण रायगडावरील एका छोट्या वास्तूचे दर्शन घेऊन त्याचा थोडं अभ्यास करणार आहोत!
अनन्यसाधारण महत्व असलेली अशी ही वास्तू आपल्याला पहिले दर्शन देते ती राजदरबारात उभे राहिल्यावर. ईशान्येकडे क्षितिजावर ठळक उठून दिसते. मुसलमानी शैलीत रचली गेलेली ही वास्तू एक मंदिर आहे हे कळायला थोडं अवकाश लागतो आणि मग लक्षात येते! होय! हेच ते! छत्रपतींच्या आज्ञेनुसार बनवले गेलेले श्री जगदीश्वर मंदिर!

एका अनामिक ओढीने आपण चालू लागतो, झपझप पावले टाकीत बाजारपेठ ओलांडून श्री जगदीश्वर मंदिरासमोर उभे राहतो. ह्या जगदीश्वराचे सौंदर्य वर्णावे तरी किती! प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय नाही अनुभवता येणार! जगदीश्वर मंदिराला एका परकोटाने संरक्षण दिले आहे. जगदीश्वर मंदिराचा प्राकार प्रशस्त आहे. १४,००० चौरस फूट इतकी जागा ह्या देवळाने व्यापली आहे! राजधानीवरील मुख्य देवतांपैकी एक आणि खुद्द छत्रपतींची गाढ श्रद्धा असल्यामुळे मंदिराच्या प्राकाराची भव्यता ही साहजिकच आहे.

जगदीश्वर मंदिराचे त्याकाळी दुसरे प्रचलित असलेले नाव म्हणजे श्री वाडेश्वर. अगदी पेशवेकालात “श्री वाडेश्वर” हा उल्लेख आला आहे. त्यामुळे शिवकालातही तो होत असावा असं तर्क आपल्याला बांधता येतो. जगदीश्वराच्या परकोटाला दोन दरवाजे आहेत – पूर्व आणि पश्चिम ह्या दिशांना तोंड करून उभे असलेले. ह्या पैकी रायगडाच्या नगारखान्याची छोटी प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पश्चिमेचा दरवाजा ह्याच्या मानाने लहान आणि साधा आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक आहे, त्यावर बरेच नक्षीकाम केलेले आढळते. हा एक छोटा नगारखाना देवळाला लाभलेला आहे. ह्या नगारखान्यावर जाण्यासाठी आतील बाजूस जिनादेखील आहे. दरवाज्याच्या बाहेरील बाजूस अत्यंत नक्षीदार असं कोरीव काम केलेले असून वरील दोन्ही बाजूस कमळाचे चिन्ह दिसते. आणखी एक गोष्ट म्हणजे, शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख (कीर्तीमुख) जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर आढळते! अशी दोन यक्षमुखे दरवाज्याच्या वरील बाजूस अत्यंत सुबकरीत्या कोरलेली आहेत! दरवाजातून आत प्रवेश केलं की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओवऱ्या नजरेस पडतात. भक्तांची, प्रवाशांची विश्रांतीची बहुदा ही सोय असावी.

पूर्वेच्या दरवाजाच्या बाहेरील दक्षिण भिंतीवर एक संस्कृत शिलालेख आहे. तो असा आहे,
“ प्रासादो जगदीश्वरस्य जगतमानन्ददोsनुज्ञया |
श्रीमच्छत्रपते: शिवस्य नृपते: सिन्हासने तिष्ठत: ||
शाके षण्णव बाणभूमिगणनादानन्दसंवस्तरे|
ज्योतीराज मुहूर्त कीर्तिसहिते शुक्लेश सार्पे तिथौ ||
वापीकूपतडागराजिरुचिरं रम्यं वनं वीथिके |
स्तंभैः कुंभिगृहैः नरेन्द्रसदनैरभ्रंलिहर्मैर्हिते ||
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हिराजिना निर्मिते|
यावच्चन्द्र्दिवकरौ विलसतस्तावसत्समुज्रुंभते || “
सोप्या शब्दात ह्या शिलालेखाचा अर्थ असं की,
“ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी , शालिवाहन शके १५९६, आनंदनामसंवस्तर ज्योतीराजमुहूर्त ह्या ज्योतिषशास्त्रात अत्यंत कल्याणकारी मानल्या गेलेल्या मुहूर्तावर श्री शिवछत्रपती सिन्हासनाधिष्ठीत झाले, त्या दिवशी हा जगदीश्वराचा प्रासाद निर्माण केला गेला. चर्चेचा विषय असलेल्या ह्या रायगडावर विहिरी, तळी, राजाच्या पसंतीस उतरलेली रम्य वने, घरे, विथिका (बाजारपेठ), स्तंभ, कुम्भिगृह (हत्तीखाना), गगनाला भिडणारे राजाचे राजवाडे अशा सुंदर वस्तू असलेल्या रायगडावर हिरोजीने निर्माण केलेला हा जगदीश्वराचा प्रासाद आकाशात जो पर्यंत चंद्र-सूर्य तळपत आहेत तो पर्यंत असाच वैभवाने तळपत राहो!”
आणि हिरोजींची ही वाक्ये तरी किती खरी ठरावीत? ह्या जगदीश्वराच्या प्रासादाने काय नाही पाहिले आजवर? राजधानीचा मान असलेल्या रायगडाचे वैभव पाहिले! जाणत्या राजाची भक्ती अनुभवली! तितकेच प्रेम आणि आशीर्वाद त्या राजाला दिले! कवी भूषणाने महाराजांना इथेच “सेर सिवराज है” ऐकवली! त्या वीर पुरुषावर रचेलेलं ते महाकाव्य ऐकून साधारण माणसासारखे स्फुरण चढले असेल का इथल्या प्रत्येक दगडाला? एका युगपुरुषाची अंत्ययात्रा पाहण्याचे दुर्दैवदेखील ह्याच जगदीश्वराने अनुभवले! मुघलांचा वेढा, महाराणी येसूबाईंचा एकाकी लढा, फंद-फितुरीमुळे मुघलांनी घेतलेला रायगड, नासधूस, जाळपोळ, लुटालूट ह्याने होरपळून गेलेला रायगड, सिद्दीची ४० वर्ष जुलमी राजवट भोगलेला रायगड, पेशवाईमध्ये गेलेले वैभव परत मिळालेला आणि शेवटी इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यात कोलमडणारा, उद्ध्वस्त होणारा छत्रपतींचा लाडका रायगड, ७ दिवस जळत असलेला रायगड – सारं सारं पाहिलंय ह्या जगदीश्वराच्या प्रासादाने! पण तो आजही तसाच उभा आहे! युगे येतील अन युगे सरतील, पण जोवर चंद्र-सूर्य आकाशात तळपत आहेत तो पर्यंत हा जगदीश्वर इथंच उभा असेल!!

जगदीश्वराचे मंदिर आयताकृती आहे. त्याला पूर्व, दक्षिण अन उत्तर असे तीन दरवाजे आहेत. मंदिरासमोर एक दगडी सुंदर नक्षीकाम असलेला नंदी बसलेला आहे. त्याचे तोंड आता भंग पावलेले आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच समोर नजरेत भरतो तो गोल दगडी चौथरा! ६ इंच उंच असलेल्या ह्या चौथऱ्यावर अगदी १९८० पर्यंत एक दगडी कासव होते. त्या नंतर ते गायब झाले. खुद्द रायगडावरून इतका अनमोल ऐतिहासिक ठेवा नाहीसा होतो हेच आपल्याला महाराजांबद्दल आणि त्यांच्या किल्ल्यांबद्दल किती आदर आहे हे दाखवून देते! मंदिरात सध्या गाभाऱ्याच्या बाजूला ३ फुटी हनुमानाची मूर्ती ठेवलेली आढळते. ही मूर्ती मूळची इथली नाही. बाहेरील कुठेलेसे हनुमान मंदिर सिद्दीच्या वास्तव्यात उध्वस्त केले असावे अन ही मूर्ती काही रामदासींनी हल्लीच्या काळात आता आणून ठेवली असावी.

मंदिराचा गाभारा प्रशस्त आहे. सध्याचे शिवलिंग हे देवळातले मूळ शिवलिंग नव्हे. सिद्दीने गडाची जेव्हा नासधूस केली त्यातच ते बेपत्ता झाले असावे. पण गाभाऱ्याची भव्यता लक्षात घेता, ते ब्त्याला साजेसेच असेल ह्याचं अंदाज येतो. प्रतापगडावरील भवानीमातेच्या मूर्तीसाठी महाराजांनी खास नेपाळहून गंडकी दगड मागवला होता. त्यामुळे रायगडावरील जगदीश्वर हा नक्कीच राजधानीला साजेसा असणार!
जगदीश्वर मंदिरातून बाहेर आल्यावर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ह्या मंदिराची रचना ही एखाद्या मंदिरासारखी नसून एखाद्या मशिदी सारखी आहे. देवळाचा कळस हा एखाद्या मशिदीच्या घुमटासारखा आहे व चार बाजूस छोटे मिनार आहेत. काहींच्या मते मागेपुढे जर मुघली आक्रमण झालेच तर देवळाचे मुघलांपासून संरक्षण करण्याकरिता त्याचे बांधकाम मुसलमानी शैलीचे असले पाहिजे. खालून गडावर तोफांचा मारा होताना माशिदिसारखे बांधकाम दिसते म्हणून मुघल तोफांचा मारा मंदिरावर करणार नाहीत असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र ते न पटण्यासारखे आहे. गडावर मशीद नसून मशिदीसारखे दिसणारे जगदीश्वराचे मंदिर आहे ही माहिती मुघलांच्या गुप्तचर खात्याने त्यांना नक्कीच पुरवली असती. अन दुसरी गोष्ट, १६८९ नंतर ४० वर्ष रायगडावर सिद्दीचा अंमल होता. त्यामुळे ही मशीद नसून मंदिर आहे हे कळायला त्याला फक्त दरवाजाचा चौथरा ओलांडून आत यावे लागले असते! अन सिद्दीच्या माणसांनी केलेल्या हानीच्या खुणा आजही दिसतात! भंगलेला नांदी, गायब झालेलं मूळचे शिवलिंग हे त्या धार्मिक आक्रमणाची साक्ष देतात!
मुसलमानी पद्धतीचं मंदिर बांधण्याचे एकंच तर्कशुद्ध उत्तर ते म्हणजे मुसलमानी स्थापत्यशैलीचा असलेला प्रभाव! शतकानुशतके असलेल्या मुस्लीम राजवटी अन त्यांच्या बांधकामाचा प्रभाव पडल्यामुळे आणि हिंदू स्थापत्य शैलीचा न झालेला विकास व प्रसार ह्यामुळेच जगदीश्वराचे असे आगळेवेगळे बांधकाम! इतकेच काय रायगडाचा नगारखाना खुद्द सारासेनिक शैलीने बांधला गेलेला आहे! पेडगावच्या बहादूरगडातील भवानीमंदिर तर हुबेहूब मशिदीसारखे दिसते! हा फक्त स्थापत्य-शैलीचा प्रभाव! आणखी काही नाही!
जगदीश्वराच्या पूर्व दरवाजाच्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावर असे लिहिले आहे,
“सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर”

रायगडसारखा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना बांधल्यामुळे महाराजांनी खुश होऊन हिरोजी इंदुलकरांना बक्षीस देऊ केलं. तेव्हा ह्या रायगडाच्या इमारत प्रमुखाची काय मागणी असावी? सोनं? नाणं? छे! जगदीश्वराच्या पायरीवर “सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर” असे कोरून द्यावे! कारण? प्रत्येक दिवशी महाराज सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना ह्याच पायरीवर त्यांचा पाय पडेल व महराजांची सेवा करण्याची संधी यामुळे हिरोजीला रोजंच मिळत राहील! बरं, हिरोजी इंदुलकर म्हणजे साधी-सुधी व्यक्ती नव्हती! तर स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र, खगोलशास्त्र, संस्क्रृत इत्यादी विषयांचं खोल अभ्यास व ज्ञान असलेला महाराजांच्या पदरीचा हा हिरा होता ! “विद्या विनयेन शोभते” ह्या म्हणीचा खरा अर्थ हिरोजी इंदुलकरांनी जगवून दाखवला!
जगदीश्वर प्रसादाच्या पूर्व दरवाज्यातून बाहेर आल्यावर समोर दिसते ती छत्रपती शिवाजी महाराज समाधी! येथेच महाराजांवर अंत्यविधी करवले गेले! आयुष्यभर तुमच्या- आमच्या स्वातंत्र्यासाठी अविश्रांत लढलेला एक महामानव इथे चीर-विश्रांती घेत आहे. आपल्या लाडक्या जगदीश्वराच्या बाजूलाच! त्या युगपुरुषाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यामुळे तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक, इथे चपला काढून, राजासमोर नमस्कार करून त्याचे आभार मानलेच पाहिजेत! समाधी समोर नतमस्तक झालेच पाहिजे!

रायगड आणि जगदीश्वर ही ठिकाणं छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली स्थळे आहेत! इतिहासप्रेमींची तीर्थक्षेत्रेच जणू! अखंड हिंदुस्थानात शिवछत्रपतींची नाव तिनंच ठिकाणी कोरून ठेवल्याचे ज्ञात आहे. त्यातील एक ठिकाण म्हणजे रायगडावरचे श्री जगदीश्वर मंदिर! खुद्द राजांची असीम भक्ती असलेलं हे देवालय, हिरोजी इंदुलकरांच्या स्थापत्य कौशल्याचा उत्कृष्ट नमुना, त्यांच्या विनयाचं प्रतिक आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार! हे देवालय आजही दिमाखात उभे आहे, उद्याही ते राहणार आहे! खरंच, जो पर्यंत चंद्र-सूर्य आकाशात तळपत राहतील, तो पर्यंत हिरोजीने निर्मिलेला हा जगदीश्वर प्रासाद असाच रायगडी तळपत राहील!!
-प्रांजल वाघ
YouTube Channel : Son Of Sahyadris
(छायाचित्र साभार : किरण शेलार ,ओंकार ओक, प्रांजल वाघ)

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).
This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.
4 comments
वाह छान माहिती!
साध्या आणि सोप्या भाषेत मांडलंय. वाचताना आपण स्वतः तिथे असल्याचा भासतं… लेखकाचं यासाठी कौतुक!
इतकं मस्त कौतुक वाचकांकडून झाल्यावर आणखी काय हवं एका ब्लॉग लेखकाला? मनःपूर्वक आभार!!
वाह छान माहिती!
साध्या आणि सोप्या भाषेत मांडलंय. वाचताना आपण स्वतः तिथे असल्याचं भासतं… लेखकाचं यासाठी कौतुक!
इतकं मस्त कौतुक वाचकांकडून झाल्यावर आणखी काय हवं एका ब्लॉग लेखकाला? मनःपूर्वक आभार!!