कोयना-चांदोली : रामघळीचा थरार!

वाघोबाच्या जंगलातील अविस्मरणीय भटकंती!

by Pranjal Wagh
783 views
एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा - रामघळ!

भाग १ इथे वाचा : कुंभार्ली घाटाचा पहारेकरी : जंगली जयगड

भाग ३ इथे वाचा : भैरोबाच्या मुलुखात!

भाग ४ इथे वाचा : मु.पो. पाथरपुंज

भाग २

निद्रेची सुरु असलेली खडतर आराधना अनुप नावाच्या प्राण्याने माझे दोन्ही खांदे जोरजोरात हलवून भंग केली! त्रासिक चेहऱ्याने, डोळे किलकिले करून, “ काये s s s ?”, असा चेहऱ्यावरील भावांनीच त्याला सवाल केल्यावर तो नेहमीप्रमाणे हसत म्हणाला, “उठ! हेळवाक आलं!”

लागलीच उठून सामान आवरून आम्ही दोघेही दरवाज्याकडे चालते झालो. “कधी एकदाची ही दोघं खाली उतरतायत आणि घंटी मारून इथून गाडी सोडतोय!”, असा भाव चेहऱ्यावर आणूनही वाहक मोठ्या संयमाने  शांत बसला होता.  जमिनीवर पाऊल ठेवून परंपरेनुसार बसचा दरवाजा खाड्कन आम्ही बंद केल्या बरोबर, “टिंग-टिंग” करत गाडी सुसाट सुटली आणि डीजेलच्या धूर-रुपी  सुगंधी आठवणी आमच्यासाठी सोडून निघून गेली!

रस्त्याच्या कडेलाच एक दुकान होते. स्थळ महामार्गाला लागून असल्यामुळे तिथं थोडीफार लोकं होतीच. साऱ्यांच्या नजरा आमच्यावरच होत्या. “भलीमोठी ओझी वागवणारे, विचित्र कपडे घातलेले हे लंबू-टिंगू इथं आडवाटेला आणि ते ही दुपारी ३-३:३० वाजता कशाला आले असतील?”, असे प्रश्न त्यांच्या डोळ्यात तरळून गेले. आम्ही आमचा मोर्चा दुकानवाल्या दादांकडे वळवला,

“ दादा, इथून ‘चाफ्याचा खडक’ला कसं जायचं?” 

“चाफ्याचा खडक? ते कशाला?”, समोरून तडक उत्तर आलं

“अहो तिथं धनगरवाडा आहे ना? आम्हाला तिथून पुढे रामघळीत जायचंय!”

“रामघळीत? ते कशापायी?”

“तिथं मुक्काम करून आम्हाला पुढे भैरवगडावर जायचंय उद्या!”

“अच्छा! हाच रस्ता घेऊन जा डोंगरावर. तासाभरात येईल धनगरवाडा!”, बाजूलाच असलेल्या कच्च्या सडकेकडे हात करत तो सद्गृहस्थ म्हणाला.

“गावातून आमच्यासोबत भैरवगडावर येईल का कोणी?”

“येईल की! गावात सांगा दुकानवाल्या लांबोरेने पाठवलंय! कोणीही येईल!”, दोन क्षण थांबून मग तो म्हणाला, “अर्धा तास थांबलात तर मी गावात जाणारच आहे. गावात आज लग्न आहे ना. मी सोडतो गाडीने!”   

क्षणभर आम्ही विचार केला. प्रस्ताव भलताच आकर्षक होता. दिवसभर केलेल्या पायपिटीमुळे, भर उन्हात आणि त्यात मे  महिन्यातल्या उष्णतेत डोंगर चढणे जीवावर आले होते. पण आम्ही थांबलो असतो तर रामघळीत पोहोचायला अंधार झाला असता आणि इतक्या दाट जंगलात अंधार लवकर होतो! नाईलाजाने मग लांबोरेदादांना निरोप दिला आणि निघालो!

पायाखाली लालभडक माती आणि डोक्यावर तितकाच भडक सूर्य! त्यात नुकताच झालेला कच्चा गाडीरस्ता यामुळे अंगावर येणाऱ्या चढाने आमचा घाम काढायला सुरुवात केला. धापा टाकीत, संथ गतीने आम्ही ‘चाफ्याचा खडक’च्या दिशेने सरकू लागलो. एक टेपाड चढून आम्ही वर सपाटीवर आलो.

“थांबलो असतो तर फुकटची लिफ्ट मिळाली असती!”, असं मी अनुपला बोलणार इतक्यात मागून गाडीचा हॉर्न ऐकू आला. धूळ उडवीत, पाठीवर सामान घेतलेला एक ‘छोटा हत्ती’ चढण चढून वर येत होता! पाहतो तर काय आत लांबोरेदादा बसलेले!

“चला बसा, सोडतो तुम्हाला गावात!”, असं त्यांनी बोलण्याचा अवकाश की आम्ही सामानासकट गाडीवर स्वार झालो! गचके देत गाडी निघाली आणि वेडीवाकडी वळणं घेत थोड्याच वेळात गावात पोहोचली! कपड्यांवरील धूळ झटकत आम्ही गाडीतून दणादण उड्या टाकल्या. तितक्यात लांबोरे दादा गाडीतून उतरले. आम्ही झटकन पुढे होऊन त्यांचे आभार मानले. मग त्यांनी घरात डोकावून कुणाला तरी आवाज दिला. क्षणभराने एक हसतमुख काटक तरुण व्यक्तिमत्व बाहेर आलं.

“हा जयराम! माझा पुतण्या! हा येईल तुमच्यासोबत!” मग जयरामला त्यांनी आमचा कार्यक्रम सांगितला. जयराम ही पटकन तयार झाला! पैशाची बोलणी झाली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता गावात हजर राहण्याचे वचन देऊन  निघणार इतक्यात लांबोरे दादा म्हणाले,

“आज गावात लग्न आहे. थांबा की! मस्त जिल्ब्यांचं जेवण जेवून झोपा इथेच निवांत!”

जिलब्या!!

दिवसभर उन्हात मनसोक्त बागडताना पोटात फारसं काही गेलेलं नव्हतं. जंगली जयगडच्या जवळ बसून सुके ठेपले घशाखाली ढकलले ते शेवटचे! पोटात राहणाऱ्या कावळा नामक जीवाने आतून काव-काव करून आठवण करायला सुरुवात केली होतीच! पण पाठीवर असलेल्या पिशवीतील ओझ्याची आठवण होताच मनाला मुरड घालावी लागली! पाठीवरचं सामान तर संपवून कमी केलं पाहिजे ना? नाहीतर पुढचा अख्खा ट्रेकभर  ते वागवावं लागलं असतं! नकोच ते! जवळच्या फायद्यासाठी दूरचे नुकसान नको! नाईलाजाने आम्ही दादांना म्हणालो, “नको दादा! आमच्याकडे जेवणाचे सामान आहे. आम्ही बनवून जेवू! परत सकाळी लवकर उठायचे आहे!”

थोडाफार आग्रह केल्यानंतर सुद्धा ही पोरं ऐकत नाहीत म्हंटल्यावर दादांनी तो विषय सोडून दुसरा सवाल केला, “ मग राहणार कुठे?”

“रामघळीत!”, आम्ही एकत्र म्हणालो!

“रामघळीत!?”, तितक्याच आश्चर्याने समोरून प्रश्न आला! समोर भूत पाहिल्यासारखे आम्हाला आपादमस्तक न्याहाळीत दादा म्हणाले, “रामघळीत राहणार? दोघेच?”

“हो… का…काय झालं?”  आम्ही सावधपणे विचारलं

“काही नाही…रात्री भीती वाटली की या गावात झोपायला!”, असं म्हणून हलकं स्मित करीत दादा चालते झाले!

आणि आम्ही दोघं तिथंच ‘आ’ वासून  गावाच्या मध्यभागी उभे!

मनात नुसता गोंधळ उडाला!

“अरे बाबा हे असं का बोलले असतील?”

“काय वाघ-बिघ येतो का काय?”

“चोर-दरोडेखोर तर नसतील ना?”

मनात शंका-कुशंकांना ऊत आला. मी आणि अनुपने एकमेकांकडे पाहिलं. पाण्याच्या डोहात उडी मारल्याशिवाय पाणी किती खोल आहे हे जसे कळत नाही तसंच रामघळीत गेल्याशिवाय तिथं काय वाढून ठेवलंय कळणार नव्हतं. म्हणून मग मोर्चा गुहेकडे वळवत आम्ही झपाझप पाऊले टाकीत निघालो!

चाफ्याचा खडक येथून रामघळीकडे जाणारी मळलेली वाट
चाफ्याचा खडक येथून रामघळीकडे जाणारी मळलेली वाट

रस्त्याच्या बाजूला कारवीचं रान माजलेलं. सात वर्षातून एकदा फुलणारी ही कारवी मे महिन्यात मात्र सुकून गेली होती! सहज लक्ष गेलं तर लक्षात आलं की आमचा अनुप जो स्वतः साडे सहा फुट उंच आहे तो या कारवीपुढे ठेंगणा दिसत होता! किमान ७-८ फुटी कारवी पाहून, अनुपला चिडवत मग रस्त्याचं एक वळण घेतलं आणि गाव मागे दिसेनास झालं.

अनुप स्वतः साडे सहा फुट उंच आहे. त्याच्या मागील कारवी किमान ७ फुट उंच असेल!
अनुप स्वतः साडे सहा फुट उंच आहे. त्याच्या मागील कारवी किमान ७ फुट उंच असेल!

काहीच पाऊले पुढे गेलो आणि काय आश्चर्य! मनुष्य्वस्तीचा असलेला कलकलाट अचानक शांत झाला. वाट थोडी वर चढू लागली आणि डावीकडे एक ओढा लागला. ओढ्यातील कमी होत चाललेलं पाणी पुढे वाढून ठेवलेल्या उन्हाळ्याच्या तीव्रतेचे संकेत देत होते. पाण्याचा स्रोत शोधण्यासाठी नजरेने ओढ्याच्या प्रवाहाविरुद्ध जात प्रवास सुरु केला आणि खोल जंगलाच्या आतील एका कृष्ण विवरावर नजर थबकली! त्या विवराच्या समोरून पाण्याची पडणारी एक नाजूक धार संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात चमकत होती – जणू सोन्याचा पाऊस! आणि त्या धारेच्या मागे, गूढ अशा अंधारात गुडूप झाली होती एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा – रामघळ!

 “रात्री भीती वाटली की या गावात झोपायला!”, असं ते दादा का म्हणाले हे हळू हळू उमजू लागलं!

सूर्य अस्तास जाऊ लगला तसं जंगल जागं होऊ लागलं. पक्षांचा किलबिलाट वाढू लागला, गव्यांचे डुरकणे ऐकू येऊ लागले. मध्येच कुठेतरी लांबून अस्वलाचा आवाज ही आला. आता मात्र हालचाल पटपट करायला हवी! रामघळ गाठली. प्रवेशाजवळ रोवलेल्या भगव्याने आमचे स्वागत केले. मधल्या गुहेत एक दगडी चौथरा आहे आणि तिथे एका कोपऱ्यात शिवलिंग आहे. तीन बाजूंनी बंद असलेली गुहा समोरून मात्र उघडीच आहे. त्यामुळे जंगली श्वापद आले तर त्याला रोखण्यासाठी काहीच संरक्षण नव्हते. सहाजिकच आम्हाला थोडी काळजी वाटली. पण त्या निबिड जंगलात हाच सर्वोत्तम पर्याय होता. तिथेच मुक्काम करायचे आम्ही ठरवले आणि गुहेत ‘प्रवेश’ केला आणि रामघळीने दणका देऊनच माझे  स्वागत केले. मुळातच गुहेचं छत जमिनीपासून पाच फुटावर असल्यामुळे आत शिरताच बॅग टाकली आणि चुकून उभा राहिलो आणि दाणकन ‘दगड’ दगडी छताला आपटला! डोकं धरून बसलेल्या मला पाहताच अनुपच हसू अनावर झाल आणि आम्ही दोघंही हसायला लागलो! एक जण दुसऱ्याची फजिती पाहून निखळ भावनेने हसत होता आणि दुसरा आपली चूक लक्षात येऊन आपल्याच मूर्खपणावर, वेदने पलीकडे जाऊन त्यात हसू मिसळीत होता!

मधल्या गुहेत एक दगडी चौथरा आहे .तिथे एका कोपऱ्यात असलेले शिवलिंग.
रामघळीतील इतर खोल्या

चौथऱ्यावर पाठपिशव्या टाकून आम्ही रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन, खाली उतरून झऱ्याचे थंडगार आणि स्वच्छ पाणी भरून घेतलं आणि येताना सरपण गोळा करून गुहेत परत आलो. चूल मांडून ती पेटवली आणि जेवण बनवायला ठेवलं. त्या काळी बाजारात नवीनच आलेले इंस्टंट छोले आम्ही घेऊन आलो होतो. पाणी उकळून त्यात ते छोले गरम होई पर्यंत सभोवताली संपूर्ण काळोख अवतरला. दूर कुठेतरी गावातील लग्नाची गडबड जंगलातील सुरु असलेल्या आवाजासोबत ऐकू येत होती. जेवण तयार होताच सकाळचे उरलेले ठेपले, ब्रेड आणि गरमागरम छोले यावर आम्ही ताव मारला. भांडी घासून, सगळं आवरलं आणि सहज घड्याळाकडे लक्ष गेलं तर फक्त ८ वाजले होते!

शहरात राहताना लोकं ८ वाजता ऑफिसवरुन घरी जायला निघतात! आणि इथे आम्ही ८ वाजता सगळं आवरून बसलो होतो! आता करायचं काय हा विचार करत शेकोटी भोवती आम्ही विचार करत बसलो! जवळच असलेलं चिक्कीचं एक पाकीट फोडून चघळायला सुरुवात केली अन गप्पांचा ओघ सुरु झाला. सह्याद्रीत केलेल्या ट्रेकवरील गोष्टी, तिथे आलेले भुताटकीचे आणि जंगली श्वापदांचे अनुभव यावर शेकोटीच्या अंधुक प्रकाशात एक संवाद घडला. भोवतालचा अंधार मी म्हणत होता, शेकोटीचा प्रकाश गिळू पाहत होता! त्या उबदार पिवळ्याधमक उजेडामुळे आणि अवतीभोवती असलेल्या गडद अंधारामुळे गूढ अशी वातावरण निर्मिती झाली होती. पूर्वी बालपणी वाचलेल्या “व्हाईट फँग” या कादंबिरीतील एक प्रसंग आठवला. कॅनडाच्या वायव्य दिशेला असलेल्या अतिशय रानटी आणि बर्फाच्छादित प्रदेशात घडणारी ही एका लांडग्याची कथा! त्याच पुस्तकातील सुरुवातीच्या प्रसंगात २ वाटसरू आपल्या स्लेड-डॉग्स सोबत आपल्या साथीदाराचा मृतदेह घेऊन जात असतात. तेव्हा त्या जंगलातील लांडगे त्यांचा कसा पद्धतशीर पाठलाग करत त्यांचे एक एक कुत्रे पळवत असतात. त्याच लांडग्यांची मादी यांच्या पैकी एका एका कुत्र्याला आपल्या जाळ्यात ओढते आणि मग अख्खी टोळी त्या कुत्र्याची शिकार करून फडशा पाडते! मैलोनमैल असलेलं पांढर शुभ्र बर्फ, निर्मनुष्य प्रदेश, संपत आलेलं राशन आणि कुत्र्यांच्या होणाऱ्या कत्तली आणि प्रत्येक शिकारी सोबत धीट होत गेलेले ते गुरगुरणारे लांडगे यामुळे त्या दोघा मित्रांवर होणारा प्रचंड मानसिक परिणाम. त्यात त्या एकाची शिकार ते लांडगे करतात. मग मात्र आपले २-३ उरलेले कुत्रे यांच्यासह एकटी उरलेली ती व्यक्ती, लांडगे शेकोटीला घाबरतील म्हणून शेवटी शेवटी स्वतः भोवती शेकोटी पेटवून घेतो. पण पोटात उसळलेल्या भुकेच्या आगीपुढे या आगीचं भय वाटेनासे झालेले लांडगे शेवटी बंदुकीच्या गोळ्यांना ही भीक न घालता हल्ला करतात! तेव्हा हतबल होऊन आपल्या डोळ्यासमोर शेकोटीच्या आगीत आपलं मांस जळताना पाहणारा आणि लचके तोडायला पुढे सरसावलेल्या उतावीळ लांडग्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यात साक्षात आपला मृत्यू  पाहणारी ती एकाकी व्यक्ती मला आठवली! तितक्यात पाठीमागून दबकत दबकत एक गार वाऱ्याची झुळूक आली आणि पाठीवर सर्रकन एकच काटा आला!

त्या शहाऱ्यासोबतच तोंडातून शब्द बाहेर पडले, “बोक्या, रात्री शेकोटी पेटती ठेवायला हवी! जर चुकून एखादा बिबट्या, अस्वल इथे यायचा विचार करणार असेल तर आग बघेल आणि येणार नाही!”

अनुपला सुद्धा ते पटले. आम्ही मग उठलो अन होतं नव्हतं ते सरपण गोळा करून साठवून ठेवले. रामघळीच्या साऱ्या गुहा विजेरीच्या प्रकाशात तपासून पाहिल्या आणि येऊन शेवटी चौथऱ्यावर अंथरूणे घातली. माझ्याकडे डोक्याला लावायचा मोठ्ठा सफेद उजेड देणारा दिवा होता. तो चार्ज केलेला होताच त्यामुळे तयार ठेवला. नेहमी सोबतीला असणारा माझा लाडका सुरा रात्रीच्या अंधारात लगेच सापडावा म्हणून  उजव्या हाता जवळच ठेवला. झोपायची तयारी केल्यावर मग आम्ही मोर्चा वळवला शेकोटीकडे. त्यात आणखी थोडं सरपण सारून तिला मोठी केली. काही छोटे ओंडके त्यात ठेवले जेणेकरून ती जास्त वेळ पेटत रहावी. मे महिना असून दाट जंगलामुळे हवेत थोडा गारवा होता. म्हणून मग पायात मोजे चढवले आणि कानटोपीने कान झाकून घेतले, पहाटे ६ वाजताचा गजर लावला आणि अंथरुणात शिरून, चादरीत स्वतःला लपेटून, गप्पा मारत पडून राहिलो.

गडकिल्ल्यांच्या विषयावर गप्पा करता करता अचानक मोहरा “आयुष्यावर बोलू काही” वगैरे तत्वज्ञानी विषयांकडे वळला. मी काहीतरी बोलत असताना मला अचानक लक्षात आलं की पलीकडून अनुप काहीच प्रतिसाद देत नाही. त्याला हाक मारणार इतक्यात त्याच्या लयबद्ध सुरेल घोरण्याने मला उत्तर दिले! आमचा अनुप भारतीय शास्त्रीय संगीत शिकलाय त्यामुळे घोरण्याची सुद्धा त्याची शैलीसुद्धा वेरीएशन असलेल्या रागदारी सारखी!माझ्या बडबडीला कंटाळून बहुदा अनुप गाढ झोपला होता पण जंगलात सुरु असलेले जंगली श्वापदांचे कॉल्स काही मला झोपू देईनात! नवीन परिसर, नवीन जागा आणि जंगली श्वापदांची चाहूल मनाला अस्वस्थ करीत होती. सहज शेकोटीकडे नजर गेली तर ती विझत आलेली. पटकन उठून तिला जरा जागे केले. शेकोटीचा उजेड वाढला तसा मागे फिरलो आणि येऊन अंथरुणावर डोळे बंद करून पडलो. विचारांच्या लाटेवर स्वार होऊन माझं मन काळाच्या प्रवाहाच्या विरोधात ४०० वर्ष गेलं आणि शेकोटीच्या केशरी उजेडात उजळून निघालेली, याच चौथऱ्यावर व्याघ्रजीनावर पद्मासनात बसलेली, एक धिप्पाड, तेजस्वी आणि ध्यानस्थ आकृती नजरेसमोर अवतरली. अंगात भगवी कफनी, छातीवर रुळणारी काळीभोर दाढी, योग दंडावर जप माळ ओढणारा उजवा हात विसावलेला होता. मुखातून सतत राम नामाचे स्मरण करणारा आणि भक्तीसोबत शक्तीची उपासना करणे हे तितकेच महत्वाचे आहे हे लोकांना वारंवार पटवून देणारा हा योगीपुरुष म्हणजेच समर्थ रामदास स्वामी! आज आम्हाला हे जंगल जर ‘घनदाट’ वाटत होतं तर विचार करा सुमारे ३५०-४०० वर्षांपूर्वी इथे काय परिस्थिती असेल? जंगली श्वापदांचा, विषारी सर्पांचा मुक्त संचार असेल. जवळपास कुठे मनुष्य वस्ती नावाला ही नसेल! आणि त्यात हा योगीपुरुष इथे निर्भयपणे मांड ठोकून बसला आहे. आपल्या शिष्यांना दीक्षा देतोय. ग्रंथ लिहून काढतोय. लोकांना प्रबोधन करतोय, बलोपासना शिकवतोय! कित्येक दिवस ते इथे, या निबिड अरण्यात एकटे राहिले असतील?  त्यांना पशूंची भीती वाटली नसेल? आदिलशाहीच्या मुलुखात आपण स्वधर्माचे काम करतोय त्यामुळे आपल्या जीविताला धोका आहे हे त्यांना ठाऊक नसेल? तरीही त्यांनी कार्य अविरत सुरूच ठेवले! आणि इथे आम्ही एक रात्र काढायची म्हणजे केवढे मोठे दिव्य पार पाडतोय असा समाज करून बसलो होतो!

‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||’  समर्थांच्या या वचनाची आठवण झाली तसे अस्वस्थ मन आश्वस्त झाले आणि काहीच वेळात शांतपणे झोप लागली. काही वेळाने डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर चक्क काळा पडदा असल्यासारखा मिट्ट काळोख! शेकोटी केव्हाच विजली होती. काळ्या पडद्यावर केशरी ठिपक्यासारखे तिचे धगधगते निखारे तिच्या असण्याची जाणीव करून देत होते. काळोख हा असा असतो हे आम्हा शहरी लोकांना कुठे कळणार? घड्याळाचे काटे अंधारात अंधुक चमकत रात्रीचे २ वाजले हे सांगत होते. शेजारी अनुप अजूनही गाढ झोपेत होता. मी पुन्हा स्वतःला झोपेच्या खोल गर्तेत लोटून दिले. गाढ झोप लागली. स्वप्नात मला भैरवगडची वाट दिसू लागली. गर्द झाडीतून, उन्हं चुकवत आम्ही पुढे चालत होतो. इतक्यात माझ्या मागे चालत असलेला अनुप जोरदार बोंब ठोकीत ओरडला,

“ए s s s !!! कोण आहे ?? कोण आहे!!??” 

हा स्वप्नात नाही तर सत्यात ओरडतोय हे लक्षात यायला अर्धा क्षण गेला आणि  खाड्कन माझे डोळे उघडले! “काय झालं? कोण आहे?” हे विचारे पर्यंत माझा एक हात सहजतेने हेड टॅार्चकडे गेलाच. तो चालू करून त्याचा प्रखर झोत मी रामघळीच्या परिसर भर फिरवला. दुसऱ्या हातात चाकू तयार होताच! मला काहीच हालचाल दिसेना. तितक्यात अनुप उत्तरला, “वाघ्या! काहीतरी आलं होतं आणि माझ्या डोक्याजवळ वास घेत होतं! मी ओरडलो आणि ते धपाधप पावलं टाकीत पळालं!”

“हो पण काहीच दिसलं नाही! आणि आपण तर लगेच दिवा लावला होता!”, मी युक्तिवाद केला.

“बिबट्या असेल का?”, अनुपचे प्रत्युत्तर आले

काय असेल नक्की? बिबट्या? अस्वल? की चोर? की आणखी काही? आजूबाजूचा परिसर धुंडाळून अंदाज लावायचा प्रयत्न केला पण खडक असल्यामुळे कुठेच पावलाचे ठसे दिसले नाहीत. साधारण १-२ मिनिटानंतर हा दिशाहीन शोध थांबला. दोघेही गुहेच्या दगडी कट्ट्यावर बसलो. काही क्षण स्तब्धतेत गेले. रातकिड्यांची किर्र-किर्र मात्र अविरत सरू होती. घड्याळात पहाटेचे ४:३० वाजले होते. जे काही आलं होतं ते आमची झोप घेऊन पळालं होतं! त्यात वेळ अशी! ना धड पहाट, ना धड रात्र! ते जे काही आलं होतं त्याने परत यायचं ठरवलं तर? त्यामुळे झोपण्याची जोखीम कोण उचलणार? तसं ही काही वेळातच आम्हाला उठायचं होतं!

 “ चल शेकोटी पेटवू!”, अनुप म्हणाला

रात्रीचे उरलेलं सरपण गोळा केलं. वीजलेल्या शेकोटीतील निखारे मोकळे केले. त्यावर हळुवार फुंकर घालून राख बाजूला करताच शेकोटीने पेट घेतला. रामघळ उजळून निघाली. रात्रीचा गारठा हवेत होताच. मग लगेच चहाचं आधण ठेवलं आणि थोड्याच वेळात चहा तयार झाला. पहाटेच्या गुलाबी थंडीत, रामघळीत शेकोटीची ऊब घेत गरमा-गरम वाफाळता चहा जसा पोटात उतरू लागला तशी तरतरी आली. दूर क्षितिजावर तांबडं फुटण्याची चिन्ह दिसू लागली होती. चहा पिऊन होताच आम्ही भराभर नाश्ता आटपला.  सामानाची आवरा-आवर केली. चहा-नाश्त्याची खरकटी भांडी धुवायला आणि पाणी भरून घ्यायला आम्ही जसे खाली झऱ्याकडे उतरलो तसं आम्हाला झऱ्याच्या जवळच कोणत्या तरी जनावराची ताजी विष्ठा नजरेस पडली! प्राथमिक अंदाज लावल्यावर ती अस्वलाची असावी असा निष्कर्ष आम्ही काढला. रात्री अस्वल आले असावे का गुहेत? विचार करूनच अंगावर शहारा आला! आमचा अंदाज जर योग्य असेल आणि जर आमच्या गुहेत अस्वल रात्री भेटायला आले असेल तर आम्ही थोडक्यात वाचलो होतो! या अस्वलाच्या गुदगुल्या भलत्याच महागात पडल्या असत्या!

अस्वल आपल्या एकाच पंज्याच्या फटक्यात अख्खा माणूस फाडू शकते इतकी त्यात शक्ती असते. हेमलकसा-आनंदवन येथील रानात अस्वलांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांचे फोटो आम्ही पाहिले होते. ते चित्र समोर आले तसा अंगावर सर्रकन काटा आला. तो विचार झटकून टाकून भांडी धुवून घेतली. पोटभर पाणी प्यायलो, बाटल्या पूर्ण भरून घेतल्या आणि गुहेत परतलो. सामानाची बांधाबांध आधीच केलेली होती. पिशव्या पाठीवर चढवत  रामघळीचा परिसर पुन्हा एकदा न्याहाळून घेतला. इथे परत कधी येणे होईल कुणास ठाऊक? गुहेतील शिवलिंगाला मनोमन नमस्कार केला आणि गावाची वाट धरली!

रामघळीतून निघण्या अगोदर घेतलेले आमचे छायाचित्र!

आता आमचं लक्ष्य होतं जयराम लांबोरेचं घर. त्याला भेटून तिथून थेट कोयनेच्या जंगलात हिरवी शाल पांघरून कोकणावर आणि देशावर नजर ठेवून बसलेल्या एका गडपुरुषाला भेटायचे होते. चाफ्याचा खडक गावात प्रवेश केला तेव्हा अर्धे गाव गाढ झोपेत होते. काल रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या लग्नातील वरातीत नाचून नाचून दमले असावेत! जयराम लांबोरे मात्र तयार होता! कालचे दादा मात्र कुठे दिसत नव्हते. त्यामुळे जरा हायसं वाटलं. मला खात्री होती की त्यांना जर रात्रीचा किस्सा सांगितला असता तर त्यांनी नक्की, “तरी मी सांगत होतो गावात जिलब्या खाऊन गप झोपा म्हणून!” असं ऐकवलं असते! इतक्यात जयरामने पोह्यांनी भरलेल्या बशा आमच्या हातात बळेच दिल्या. “अरे नको आमचं झालंय खाऊन!”, असा निरर्थक, कमकुवत विरोध आम्ही केला. जयरामने त्याला भीक घातली नाही! “घ्या खाऊन! काय होतंय! लई लांब जायचंय!”, असं म्हणून आपल्यापुरता प्रश्नाचा निकाल लावून गडी घराच्या आत चालता झाला!

सकाळच्या प्रसन्न वातावरणात ते घरगुती गरम पोहे आमच्यासमोर किती वेळ टिकाव धरणार? २ मिनिटात बशा रिकाम्या झाल्या आणि तितक्यात जयरामने हातात चहाचे २ कप आणून दिले. वाफाळता, गोड मिष्ट चहाचा घोट घेतल्या-घेतल्या जयरामने पहिला सवाल टाकला,

“ दादा तुम्ही भैरवगडावरून परत येणारे गावात की पुढे जाणारे?”

“नाही! तिथून पुढे पाथरपुंजला जाऊ आम्ही!”

“अच्छा!”, असं म्हणून तो पुन्हा आत गेला. काही वेळाने तो बाहेर आला तेव्हा त्याच्यासोबत त्याची बायको होती. तिच्या हातात जेवणाची पिशवी होती. दोघांच्याही कंबरेला कोयते लटकत होते. आमच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून तो म्हणाला, “आम्ही जंगलातून एकटे कधीच परत येत न्हाई! जनावरं असत्यात!! सोबत म्हणून घेतली बायकोला!” असं म्हणत त्याने एक शीळ घातली आणि आवाज दिला, “गंग्या s s s !”

धनुष्याचा टणत्कार होऊन एखादा बाण सुटावा तसा एक सफेद कुत्रा कुठूनसा धावत येऊन आमच्यासमोर प्रकट झाला! इतका वेळ कुठेतरी मस्ती करण्यात दंग असलेल्या या चंचल श्वानाने आधी आपल्या मालकाकडून मनसोक्त लाड करून घेतले आणि मग आमच्या अंगावर उड्या मारू लागला! तसा जयराम डाफरला, “गंग्या! गप बैस!”

मी मात्र मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याचे खूप लाड केले आणि म्हणालो, “ असू द्या! मला आवडतात कुत्री!”

हे ऐकताच गंग्या आणखीनच खूष झाला! आम्ही जसे निघालो तसा हा सगळ्यांच्या पुढे! कुठे मांजरावर भूंक, कुठे कोंबड्यावर धावून जा! आमच्या पंचकडीची ‘रोड ओपनिंग पार्टी’ होता गंग्या! या गंग्याच्या शौर्याची प्रचिती आम्हला भैरवगडाच्या वाटेवर लवकरच येणार होती! पण ती गोष्ट पुढील भागात!

(क्रमश:)

– प्रांजल वाघ

भाग ३ इथे वाचा : भैरोबाच्या मुलुखात!

भाग ४ इथे वाचा : मु.पो. पाथरपुंज

भाग ५ इथे वाचा : प्रचितगडाची प्रचिती आणि चांदोलीतील पाठलाग!

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

छायाचित्र साभार : अनुप बोकील, प्रांजल वाघ

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका… आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

18 comments

Anup Bokil May 28, 2023 - 1:28 PM

Amazing blog !! Let’s go there again!

Reply
Pranjal Wagh May 28, 2023 - 2:14 PM

Thank you sir!!
Yes lets go again!!

Reply
Amit balapurkar May 28, 2023 - 3:01 PM

Apratim lihila ahes mitra

Reply
Pranjal Wagh May 28, 2023 - 5:13 PM

खूप खूप आभार!!

Reply
Anirudha Limaye May 28, 2023 - 3:19 PM

आमचे लाडके भटकंतीमित्र अजय काकडे ह्यांचाबरोबर रामघळीत जाण्याचा योग आला होता. तुझा लेख
भुतकाळात घेउन गेला पण शेवटी अस वाटल कि अगदी परवा परवा जाऊन आलोय भैरवगड आणि रामघळीत. पुढील भागाची प्रतिक्षा करतोय.

Reply
Pranjal Wagh May 29, 2023 - 12:26 AM

मनःपूर्वक आभार!! अजय सरांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही सह्याद्रीत फिरू शकतो! पुढील भाग लवकरच!

Reply
भूषण शिंदे May 29, 2023 - 12:41 AM

अप्रतिम प्रांजल! मस्त ब्लॉग.
आपण आता ओल्ड स्कूल असल्याचा भास ह्योयाला लागलंय ????.

Reply
Pranjal Wagh May 29, 2023 - 6:44 PM

मनःपूर्वक आभार!! जुने असलो तरी सोने आहोत! 😀 😀 😀

Reply
Archis Pednekar May 29, 2023 - 10:18 AM

सुंदर लिखाण एखाद्या adventure thriller कादंबरीसारखे ????

Reply
Pranjal Wagh May 29, 2023 - 6:28 PM

मनःपूर्वक आभार!!

Reply
Kailash Dhumal May 29, 2023 - 12:52 PM

रामघळ आणि भैरवगड एकाच कारणामुळे आयुष्यभर लक्षात राहील आणि ते म्हणजे “गवा”. इफ यू नो व्हॉट आय मीन 😀 😀

बाकी मस्त लिहलय as usual. जास्त वेळ घालवू नकोस आणि पटापट सगळं लिहून काढ.

Reply
Pranjal Wagh May 29, 2023 - 6:24 PM

धन्यवाद सर!! पुढील भाग तयार आहे! उद्या पर्यंत पोस्ट होईल!

Reply
Ishwar Gaikwad May 29, 2023 - 4:00 PM

छान रे, छान लिहिलंस! अगदी non-stop वाचलं आणि वाचता-वाचताच ‘भूतकाळा’त गेलो.. तब्बल सत्तावीस वर्षे मागे. स्वयंपाकानंतरच्या आवराआवरीत गुंतल्याने त्यावेळी मला अगदी गुहेच्या तोंडाशीच झोपायला जागा मिळाली होती, झोपेपर्यंत अस्वलांच्या गप्पा नि गोष्टीही खूप झाल्याने भीतीयुक्त चित्र-विचित्र कल्पना करीतच पण चांगलीच उशिरा झोप लागली. हेळवाक ते रामघळ एवढी चाल झाली होती ना! झोप तर लागली, गाढही झोपलो, अगदी पहाटेच्या कॉलपर्यंत! अस्वलांची भीतीही घातली गेलेली होती पण सुदैवाने घडलं काहीच नव्हतं; प्रत्यक्षातही नी स्वप्नातही!! नंतर रस्त्याने गडापर्यंत दर्शन झालं म्हणा. असो. तुझा अनुभव वाचताना राहून राहून तो ट्रेक, ती रामघळ नि अस्वलंच डोळ्यांसमोर उभी राहत होती.

Reply
Pranjal Wagh May 29, 2023 - 6:41 PM

तुमचा अनुभव भारी आहे! त्या काळी जंगला आणखीन दाट असणार! आमचा जन्म खूप उशिरा झाला असं वाटतंय! कौतुक केल्याबद्दल आभार!! पुढील भाग लवकरच येत आहे!

Reply
सुनील जोशी May 30, 2023 - 6:13 PM

अफलातून चित्रदर्शी लिखाण झालंय. तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहू

Reply
Pranjal Wagh May 30, 2023 - 7:14 PM

आभारी आहे सर!! तिसरा भागसुद्धा टाकलाय ब्लॉगवर! तो ही वाचून अभिप्राय द्यावा ही विनंती! 😀

Reply
Pramod sunanda sawant May 30, 2023 - 10:58 PM

दुर्गभ्रमण करताना मनात ज्याप्रमाणे इतिहास आठवत असतं.
तसच दाटजंगल लागल की प्राणी पाहण्याची ‘भीतीदायक आतूरता’ वाढत जाते.
दुसरा भाग उत्तम लिहलं आहे.
????????

Reply
Pranjal Wagh May 31, 2023 - 8:27 AM

प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक habitat मध्ये पाहणे ही एक वेगळीच पर्वणी आणि अनुभूती असते! प्राणीसंग्रहालयात प्राणी पाहणे नको से वाटते. अनेकदा ट्रेकला कुठे बिबट्या तर नाही न दिसत वगैरे असे उगाच बघत असतो आपण! 😀

Reply

Leave a Reply to Pranjal Wagh

You may also like