मार्च २०१६ साली आम्ही कर्नाटकातील किल्ले आणि मंदिरं बघायला पहिल्यांदा बाहेर पडलो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गड-किल्ले हुडकत हिंडणारे आम्ही, मग अचानक दक्षिणेत जायचं कुठून सुचलं? दादरला पुस्तकांच्या दुकानात फिरताना एक अद्भुत ग्रंथ हाती लागला. “एक झुंज शर्थीची” असं त्याचं नाव! सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशजांनी लिहिलेला. त्यात कर्नाटक-आंध्र मधील मराठ्यांचे किल्ले पाहिले आणि वेडंच लागलं! तिथल्या किल्ल्यांची बांधणी, भूगोल, इतिहास आणि त्या सगळ्याशी आपली जोडली गेलेली नाळ यांनी साद घातली आणि शेवटी २०१६ सालच्या होळीला आम्ही सीमोल्लंघन करून बेळगावात दाखल झालो! आणि तिथून जो कर्नाटक भटकंतीचा सपाटा सुरु झाला तो आजतागायत थांबलेला नाही आणि थांबणार ही नाही!
मराठी माणूस जेव्हा उत्तरेकडील राज्यांकडे प्रयाण करतो तेव्हा त्याला संवाद साधताना तसे अडथळे येत नाहीत कारण महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यात हिंदी भाषा बऱ्यापैकी समजली आणि बोलली जाते. पण महाराष्ट्राकडून दक्षिणेकडे जाताना आणि खासकरून आडवाटेवरील दुर्ग आणि मंदिरं बघायला जाताना भाषेची अडचण फार जाणवू शकते, किंबहुना त्याचीच थोडी धाकधूक मनात होतीच! २०१६ ते २०२४ या आठ वर्षांच्या कालावधीत आम्ही कर्नाटक-आंध्रमधील किल्ल्यांना सहा वेळा भेट दिली आणि प्रत्येक वेळी हे भाषेचे अडथळे पार करावे लागले!
बेळगाव-खानापूर-हलशी-येळ्ळूर हा भाग मराठी बोलणाऱ्यांचाच! त्यामुळे इथे लोकांशी बोलायला, मदत मागायला भाषेचा अडथळा येत नाही! पण जसे तुम्ही बेळगाव ओलांडून पूर्वेकडील कित्तूर-सौंदत्तीकडे प्रवास करता तसं मराठी भाषिक जनता कमी होत जाते, कन्नडा बोलणारी मंडळी वाढतातच पण तिथे हिंदी येत असणारी जनता अगदी विरळाच!
पण खरं सांगू? संवाद साधायला, आपल्या भावना पोहोचवायला आम्हाला का कोण जाने फरशी अडचण आलीच नाही कधी! जिथे जिथे म्हणून किल्ले, मंदिरे धुंडाळीत गेलो – तिथे तिथे मदत मिळत गेली! काही वेळा चक्क मराठी बोलणारे स्थानिक लोकं भेटले!

आता हेच उदाहरण घ्या. यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वनदुर्ग नावाचं छोटं खेड आहे. अर्थात खणखणीत तटबंदी आणि बुलंद बुरुज असलेला वनदुर्ग नामक भुईकोट तिथे दिमाखात उभा आहे. किल्ल्यात वस्ती आहे त्यामुळे किल्ल्यात जाग आहे. २०१७ च्या भर गर्मीत हा किल्ला पाहून आम्ही बाहेर आलो आणि शहापूरला जाणारे वाहन कुठे मिळेल याची चौकशी हिंदीतून करू लागलो. काहीच उत्तर मिळेना! येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांना विचारले पण हिंदी कुणालाच येत नव्हती. किल्ल्यातून निघून काही अंतर पुढे गेल्यावर एक भला मोठा वटवृक्ष लागला आणि त्याच्या पारावर गावकऱ्यांच्या गप्पा सुरु होत्या! इथे आपलं नशीब अजमावू म्हणून आम्ही पुढे झालो आणि हिंदीत सवाल केला,
“अण्णा, शहापूर जाने के लिये बस या जीप कहा मिलेगी?”
ही विचित्र दिसणारी, पाठपिशवी वागवणारी, घामाने डबडबलेली, धुळीनं माखलेली टोळी कोण म्हणून सारे गावकरी आश्चर्याने आमच्याकडे पाहत राहिली! तितक्यात त्या घोळक्यातून चक्क मराठीत उत्तर देत एक लुंगी नेसलेला इसम पुढे आला, “इथून सरळ पुढे गेलात की जिपा मिळतील तुम्हाला!”
मराठीचे बोल कानी पडताच आमच्या चेहऱ्यावर हास्यरुपी आनंद प्रकट झाला. त्या सद्गृहस्थाचे आभार मानीत आम्ही त्याला सवाल केला, “दादा, तुम्हाला मराठी कसं येतं?”
हसत हसत तो म्हणाला, “आम्ही सोलापूरचे! सासुरवाडीला आलोय!”
आता कोणी याला योगायोग म्हणेल किवा कुणी दैवी योग म्हणेल पण असे एक न अनेक किस्से आमच्यासोबत घडले आहेत!
वनदुर्गाच्या बाबतीत आम्हाला मराठी बोलणारा सोलापुरी गडी भेटला पण यादगीर जिल्ह्यातील सुरपूर जवळील वाकीनखेडा (Wagingera) या गावी किल्ला बघायला गेलो असताना चक्क एकमेकांच्या भाषा न समजता आम्ही एका युवकासोबत अख्खा किल्ला फिरलो! वाकीनखेडा गावी बस मधून उतरताच आम्ही काही बायकांना अस्खलित हिंदीमध्ये प्रश्न केला, “किले पे कहा से जाने का?”
समस्त स्त्रीवर्गाने समोरून कन्नडामध्ये फैरी झाडताच आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला, “कन्नडा गोथिल्ला” (मला कन्नडा येत नाही!)


हे ऐकताच त्या एकमेकात कन्नडामध्ये काहीतरी बोलल्या. शब्द समजले नाहीत पण त्यांच्या बोलण्याचा सूर आम्ही अचूक हेरला. त्या बायका मराठी असत्या तर बहुदा, “ भाषा येत नाही तर कशाला (मारायला) इथं आलात का?” असं बोलल्या असत्या. पण सुदैवाने तिथं खेळणाऱ्या पोरांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा वेष परीषण केलेला शंकर उभा होता. त्याने आम्हाला हाताने खुणावलं आणि अख्खा किल्ला फिरवून दाखवला. या संपूर्ण गडफेरीमध्ये तो कन्नडामध्ये आम्हाला सगळं समजावून सांगत होता आणि आम्ही तर्काने शब्दांचा अर्थ लावीत लावीत पूर्ण किल्ला पाहिला! त्याने जेव्हा किल्ला दाखवताना मध्येच आम्हाला पायथ्याला त्याच्या आजीच्या घरी येऊन पाणी प्यायचं आमंत्रण दिलं तेव्हा भावना बरोबर पोहोचल्या! भाषेचा अडसर कुठेच आला नाही! तोच अनुभव सुरपूरचा राजवाडा मौनेश सोबत पाहताना आला! त्यात तो मला, “तुम्ही कन्नडा फिल्मच्या नायकासारखे दिसता!” म्हणाल्याने अंगावर जरा मुठभर मांस चढले!
पण माझा सर्वात आवडता अनुभव सौंदत्तीचा भुईकोट पाहतानाचा आहे!


२०१६ सालची ही गोष्ट! यल्लमा देवीच्या डोंगरावर असलेला परसगड (परशुरामाचा गड) पाहून, केदार आणि मी सौंदत्ती शहरात उतरलो. रट्ट राजांच्या ‘सुगंधावर्ती” नगरीत उभा असलेला हा छोटेखानी कोट, एखादा किल्ला कसा जतन करावा याचे मूर्तिमंत उदाहरण आहे! किल्ला पाहता पाहता आम्ही बालेकिल्ल्याच्या आत असलेल्या “काडसिद्धेश्वर” मंदिराच्या आवारात पोहोचलो. मंदिराच्या आवारात अथवा किल्ल्यात फुलवलेल्या बागेत स्थानिक संध्याकाळी न्याहारी घेऊन फिरायला येतात. तसेच एक भले मोठे कुटुंब आणि त्यांची मुलं मंदिरात आली होती. हातात कॅमेरा घेऊन आम्ही मंदिराचे फोटो काढण्यात गुंग होतो. इतक्यात पकडापकडी खेळणाऱ्या त्या मुलांचा एक घोळका पळत आला आणि आम्हाला पाहताच थबकला! आमचा अवतार पाहताच, कावरे-बावरे झाले आणि तिथून त्यांनी धूम ठोकली. पळत पळत जाऊन त्यांच्या मोठ्या बहिणींना घेऊन आले. मग तोडक्या मोडक्या हिंदीत आणि कन्नडाट संवाद सुरु झाला. आम्ही “मुंबई”हून आलो हे समजल्यावर तर त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. तितक्यात एक छोटा मुलगा मंदिराच्या परकोटाच्या छज्यांकडे बोट दाखवीत काही बोलू लागला. “डीजाईन”, “डीफ्फरंट” हे परिचयाचे इंग्रजी बोल कानी पडताच माझ्या लक्षात आलं की या प्रत्येक छज्ज्यावर वेगवेगळ नक्षीकाम केलेले आहे! एकमेकांच्या भाषा न समजताच इतका भारी संवाद झाला नसता तर ही माहिती आम्हाला कुठून मिळाली असती?

मुलांशी गट्टी जमल्यावर मग लगेच त्यांच्या फर्माईशी झाडू लागल्या. मनसोक्त फोटो आमच्याकडून काढून घेतले आणि त्यांना ते दाखवताच त्यांचे खिदळणे सुरु झाले. तितक्यात मागे उभ्या असलेल्या “ताई”वर्गात चर्चा सुरु झाली. शब्द कळेनात पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली पाहून असे वाटले की त्या आपापसात, “ए आपण त्याला घेऊन येऊ या का फोटोसाठी बाहेर?” असं काहीसं बोलत होत्या. मुलींचं एकमत झालं आणि त्यांच्यातली एक मंदिरात जाऊन एक लहानसं, कापली गंध लावलेलं छकुलं बाळ घेऊन बाहेर आली. मंदिराच्या कट्ट्यावर त्याला ठेवलं आणि आमच्याकडे पाहून, “अण्णा याचेपण फोटो काढा!” असं काहीसं म्हणाली!
कॅमेरा सरसावून मी पुढे झालो आणि त्याचे छायाचित्र काढले. आणि त्याच क्षणी त्या पिल्लाने त्याचे टपोरे बोलके डोळे माझ्यावर रोखले. आमची नजरानजर झाली आणि मला कळून चुकले – संवाद साधायला भाषा नसते समजायची, समजायच्या असतात भावना!

-प्रांजल वाघ
३१ मार्च २०२४
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
(सामना या दैनिकाच्या “उत्सव” या रविवार पुरवणीत “फिरस्ती” या स्तंभात हा लेख ३१ मार्च २०२४ तारखेला प्रकाशित झालेला आहे )