बल्लरीच्या किल्ल्यावरील एक मंतरलेली संध्याकाळ!

by Pranjal Wagh
430 views
बल्लरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बसवण्णा मंदिराच्या आवारात समोर उभा ठाकलेला सांज देखावा अधाशासारखा पहात राहिलो!

ती संध्याकाळच मंतरलेली होती!

दिवसभराची आंध्र-कर्नाटकच्या अक्षरश: जाळणाऱ्या उन्हातली गडभ्रमंती, गुत्तीचा किल्ला पाहून भारावल्या अवस्थेत केलेला गुत्ती-बल्लरी बस प्रवास. संध्याकाळी ३:३० वाजता बल्लरीत पोहोचल्यावर आम्हाला कळले की बल्लरीचा किल्ला ५:३० वाजता बंद केला जातो म्हणून ५ जण एका रिक्षामध्ये कोंबून त्वरित किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचून तास-दीड तासात धावत पाहिलेला बल्लरीचा खणखणीत दुर्ग! आणि हे सगळे करत असताना भाजून काढणारा प्रचंड उकाडा! या साऱ्यामुळे आलेला थकवा आणि अंगाची होणारी आग, पायथ्याला असलेल्या प्राचीन बसवण्णा मंदिराच्या आवारात येताच, त्या मंतरलेल्या संध्याकाळी एका क्षणात विरून गेला! मंत्रमुग्ध करून एका वेगळ्याच अवस्थेत मनाला घेऊन गेला!

आंध्रच्या सकाळच्या कडक उन्हाची झळ सोशीत, वेडावल्यागत पाहिलेल्या घोरपड्यांच्या गुत्ती किल्ल्याची झिंग अजूनही डोक्यावर स्वार होती. तब्बल १३ दरवाजे आणि ४ टेकड्यांवर पसरलेल्या, १६ किमी परीघ असलेल्या गुत्तीने भलतीच भुरळ घातली होती. आत्मा तृप्त करणारा आंध्र स्टाईल टिफिन खाऊन, वर थंडगार ताकाचे प्याले रिचवून, ढेकर देत देत, धावतच बस पकडली आणि गरमा-गरम वाऱ्यावर “फिक्र को धुवे में” उडवत आम्ही ५ पांडव बल्लरीच्या रोखाने सुसाट निघालो!

बल्लरी शहरात पोहोचायला आम्हाला साधारण दुपारचे ३:३० वाजले. ३ तासांची बसची रपेट आणि प्रचंड गरमी यांनी डोकं ठणकायला लागलं होतं. त्यामुळे सामान एखाद्या “लाड्जं” मध्ये टाकून, भर हलका करून, किल्ल्यावर चढाई करावी असा बेत ठरला. आता हे “लाड्जं” म्हणजे काय? ज्या संस्थेला मराठीत आपण “लॉज” म्हणतो त्याला कर्नाटकात “लाड्जं” म्हणतात आणि बरं का, ते बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आणि सूर असतो! तो तुम्हाला जमला तर ठीक, नाहीतर “लाज” जाते! खोलीत सामानाचा त्याग करून आम्ही रिसेप्शनला आलो, सहज म्हणून किल्ल्याची चौकशी केली, तेव्हा आम्हाला कळले की किल्ला संध्याकाळी ५;३० वाजता बंद होतो! जेमतेम पाऊणे दोन तास हाताशी आहेत हे लक्षात येताच, आम्ही धूम ठोकली. बाहेर एक रिक्षा उभी होतीच. त्या एकाच रिक्षात आम्ही ५ जण कोंबून बसलो. घासाघीस करण्याचा प्रश्नच नव्हता, इथे पैशापेक्षा जास्त महत्वाचा वेळ होता म्हणून रस्ता कापत आम्ही सुसाट निघालो!

बल्लरीचा अप्पर हिल फोर्ट
बल्लरीचा अप्पर हिल फोर्ट

बल्लरीच्या किल्ल्याला दोन भाग आहेत. “लोअर फोर्ट” आणि “अप्पर हिल फोर्ट”  – नावाप्रमाणेच लोअर फोर्ट म्हणजे जमिनीवर असलेली तटबंदी आणि अप्पर हिल फोर्ट म्हणजे “बल्लरी गुड्डा” या डोंगरावर बांधलेला किल्ला. कानडीत डोंगराला “गुड्डा” म्हणतात. सध्या लोअर फोर्टच्या दरवाजातून रस्ता आत जातो. आतील भागात वस्ती आहे. अप्पर हिल फोर्ट जो आहे तो सध्या कर्नाटक पुरातत्वखात्याच्या अखत्यारीत आहे. सकाळी ०८:३० ते संध्याकाळी ०५:३० पर्यंत किल्ल्यावर प्रवेश सुरु असतो. किल्ल्याची देखरेख अत्यंत व्यवस्थित ठेवली जाते. गडमाथ्यावर सुरक्षारक्षकांची गस्त सुरु असते. गड खूपच स्वच्छ ठेवला जातो. गडावरील वास्तूदेखील सुस्थितीत आहेत. गडाखाली थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय आहे, कचऱ्याचे डबे आहेत. एक लक्षणीय बाब ही आहे की गडावर कोणत्याही प्रकारचे हॉटेल, खाण्या-पिण्याच्या टपऱ्या किवा दुकानं नाहीत! गडावर प्रवेश करण्यास प्रवेश शुल्क आकारले जाते आणि त्यातूनच (काही अंशी) येथील सुरक्षारक्षकांचे वेतन, साफसफाई, डागडुजी या साऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन होत असावे! महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर हेच मॉडेल अनुसरता आले तर तिथली बरीचशी संवर्धनाची कामे अधिक गतीने होतील असा एक विचार मनाला चाटून गेला!

लगबगीने तिकीट खिडकीवर पोहोचत गडावर जाण्याची तिकीट आम्ही काढली. फक्त २५ रुपये! व्यवस्थित बारकोड असलेली प्रिंटेड तिकीट इथे मिळतात. तिकीट विक्री आणि गल्ला याची नोंद इलेक्ट्रोनिकली होते त्यामुळे पैसे खाणे वगैरे प्रकार होत नाहीत. “हे कसलं भारी सिस्टम आहे ना!”, असं मी केदारला कौतुकाने म्हंटल आणि इतक्यात तिकीट खिडकीवरील माणसाला माझ्या गळ्यात लटकलेलं कॅमेऱ्याचं लटांबर दिसलं.

“सार, फोटो निकालने का चार्ज लगेगा!”

“कितना?”

“१००”

तिकिटाचे २५ पण कॅमेरा वापरण्याचे आणखी १००! हा कुठला न्याय? पण वेळ कमी असल्यामुळे में हुज्जत न घालता पटकन १०० रु काढले आणि त्याला दिले. “सार, फोटो चलेगा, विडीओ नही निकाल सकते”

बर ठीक आहे म्हंटल आणि पावतीसाठी हात पुढे केला.

जणू त्याच्या मुलीचाच हात मागायला मी महाराष्ट्रातून आल्यासारखं त्याने माझ्याकडे पहिले. त्याक्षणी त्याच्या चेहऱ्यावर जे काही भाव तरळून गेले त्याला तोड नाही. आश्चर्य, गोंधळ, कीव या सगळ्यांचं जे काही मिश्रण त्याने सराईतपणे पेश केलं ते एखादा अभिनेता क्वचितच करू शकला असता!

काही क्षण स्तब्धतेत गेले. मग मीच म्हणलं, “कॅमेरा फीज का रिसीट?”

त्याची ट्युबलाईट पेटली!

“ सार, इसका रिसीट नई होना!”

“ क्यू?”, मी उडालोच!

“ऐसा सिस्टम नही है!”

“लिख के दो पावती!”

“क्या?”

“पावती! पावती!”

तो मख्खच!

“रिसीट दो रायटिंग में!”, मी जरा वैतागून म्हंटल

“नही होगा सार!”

“ऐसा कैसा नही? नही है तो पैसा वापस दो! तुम्हारे साब किधर है?”, स्वर चढायला लागला म्हंटल्यावर आमचे बाकीचे मेंबर आले. मी खूण करून केदारला कामेरा लपव असे सुचवले! नाहीतर आणखी १०० रुपये कोण भरेल? त्याने पटकन कॅमेरा बॅगमध्ये लपवला. आणि मग सगळेच भांडायला लागलो!

पण काही झालं तरी सरकारी कारकून तो! मागे हटणार थोडीच? आमच्या बोलण्याच्या बिलकुल परिणाम होऊ न देता मख्ख चेहऱ्याने मग त्याने त्याच्या साहेबांना फोन लावला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला कागदावर लिहून, सही-शिक्का मारून दिलं! पण हा काही वैध पुरावा नव्हता! आमच्यामते ते १०० रुपये गळ्याला शेक द्यायला वापरले जाणार होते बहुतेक! पण शेवटी आमची शर्यत घड्याळासोबत लागलेली म्हणून ते प्रकरण न वाढवता, त्या १०० रुपयाची आहुती देऊन आम्ही पायऱ्या चढायला लागलो! बल्लरीच्या रखवालदारांनी आम्हाला बहुतेक “चिल्लरीचा” चुना लावला होता!

झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून वेळ न दवडता मी किल्ल्याच्या पायरीवर पहिलं पाऊल ठेवलं अन आ वासून ते देखणं रुपडं पाहतच राहिलो! कर्नाटकातील आणि आंध्रमधील डोंगर सह्याद्रीपेक्षा पूर्णतः वेगळे! आपल्याकडे कठीण बसाल्टचे उभेच्या उभे, अनगड कडे असतात. त्या निमुळत्या, नागमोडी, धारदार काळ्या कड्यांच्या डोईवर हिऱ्यासारखे अभेद्य दरवाजे आणि तटा-बुरुजांच्या झालरींनी सजवलेले शिरपेचच जणू अनामिक हातांनी मोठ्या शिताफीने बांधून काढले आहेत! शतकानुशतके उन, पाऊस, वाऱ्यासोबतच अनेक नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना तोंड देत हे गड-कोट-दुर्ग आजही उभे आहेत! तसेच कन्नड देशात तुम्ही गेल्यावर सारा भूगोलच बदलून जातो! जेव्हा बसाल्टची जागा ग्रॅनाईट घेतो, गर्द झाडी आणि गच्च रान काटेरी झुडपांना वाट मोकळी करून देतात, उभे उभे चढ, सहज सोपे होऊन जातात तेव्हा समजून जायचं – आपलं आगमन नम्मा कर्नाटकात झालेलं आहे!

बल्लरी अप्पर हिल फोर्टचे प्रवेशद्वार
बल्लरी अप्पर हिल फोर्टचे प्रवेशद्वार

इतिहास हा भूगोलाच्या आधारे लिहिला जातो. ज्या राज्याला भूगोलाचे महत्व समजले नाही ते राज्य जास्त काळ टिकत नाही. म्हणून सह्याद्रीतील किल्ल्यांवर अनेकदा तुटपुंजी तटबंदी आढळते कारण तिथे प्रत्यक्ष सह्याद्रीचा कडा छातीचा अभेद्य कोट करून उभा असतो. भूगोलाच्या साथीने लढाऊ किल्ले बांधून म्हणूनच इतिहास रचला गेला! पण कर्नाटकातील ग्रॅनाईटचे डोंगर कमी उंचीचे, चढायला सुकर! नैसर्गिक संरक्षण तसे कमी! मग काय करावे? दगडाच्या भिंती-बुरुज-दरवाजे यांचा अक्षरशः चक्रव्यूह रचायचा! एकतर ते कवच फोडून शत्रू आत येणे महाकठीण आणि चुकून जर शत्रू आत आलाच तर त्याच्यावर चहूबाजूंनी तुफान मारा करण्याची  इतकी चोख व्यवस्था करून ठेवायची की आत आलेला शत्रू जिवंत बाहेर जाणे निव्वळ अशक्यच!

अगदी तसाच हा बल्लरीचा किल्ला रचलेला पाहून मी केवळ थक्क झालो! किल्ल्याच्या महादरवाजातून आत गेल्यावर सरळ चढण सुरु होते. तटा-बुरुजाच्या पहाऱ्यात तुमचा प्रवास सुरु होतो! आणि काही पावले पुढे गेल्यावर या किल्ल्याचे खरे बलस्थान समोर येते. ग्रॅनाईटच्या मोठाल्या पाषाणांची नैसर्गिक रचना वापरून, त्यांचेच बुरुज आणि छत बनवून, त्याखालून भुयारी मार्गच काढलाय आणि वरील दगडांच्या फटींमधून खालच्या शत्रूवर बाण, दगड, गोळ्या यांचा तुफान वर्षाव करण्याची व्यवस्था करून ठेवलीये! हे कुणाचं अफाट डोकं?

वास्तविक बल्लरीचा प्रदेश हा मौर्य, सातवाहन, पल्लव, कदंब, कल्याणी चालुक्य, होयसळ इत्यादी राजवटींच्या अमलाखाली असलेला प्रदेश. त्याच राजवटीत तो भरभराटला आणि समृद्ध झाला. पुढे विजयनगर साम्राज्याचा एक मांडलिक असलेला हनुमप्पा नायक याने हा बल्लरीचा अप्पर हिल फोर्ट बांधला. सोळाव्या शतकात तालीकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा पराभव झाल्यावर हे नायक आदिलशाहीचे मांडलिक बनले. छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. पुढे नायकांना तो किल्ला परत सुपूर्द करून त्यांना आपले मांडलिक बनवले. मराठी साम्राज्याचं आणि बल्लरीच  हे असं जवळच नातं आहे!

१६८५ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही संपवताना हा किल्ला जिंकला. त्याच्या मृत्युनंतर निजामाचं प्रस्थ वाढू लागलं. पण नायकांनी निजामाचं मांडलिकत्व नाकारलं. निजामाने चाल करून बल्लरीचा ताबा घेतला. लाचार नायकांनी मदतीसाठी हैदर अलीकडे धाव घेतली. हैदर टपून बसलेलाच होता. त्याने बल्लरी किल्ल्यावर आक्रमण करून तो जिंकून घेतला, नायकांना मांडलिक बनवले! ही घटना साधारण १७६९ची!

त्या नंतर क्रूरकर्मा टिपू सुलतानचा बाप हैदर अली याने फ्रेंच इंजिनिअर कामाला लावून हा किल्ला पुनः बांधून काढलाय! त्याचीच ही फलश्रुती! अशीच भुयारी रचना असलेला दुसरा किल्ला – पण माझ्यामते याहून अधिक खडतर आणि सर करायला कठीण – म्हणजे कोप्पळ जवळ असलेला बहादूर बंडी! बल्लरीच्या किल्ल्याच्या कौतुकात जास्त शब्द दवडत नाही आपण प्रत्यक्ष व्हिडीओच पहा! काय अप्रतीम दुर्गबांधणी आहे!

ग्रॅनाईटच्या मोठाल्या पाषाणांची नैसर्गिक रचना वापरून, त्यांचेच बुरुज आणि छत बनवून, त्याखालून भुयारी मार्गच काढलाय आणि वरील दगडांच्या फटींमधून खालच्या शत्रूवर बाण, दगड, गोळ्या यांचा तुफान वर्षाव करण्याची व्यवस्था करून ठेवलीये!

इतकं सगळं दिव्य पार पडून जर शत्रू जिवंत वाचलाच तर समोर उभा ठाकतो तो एक भलामोठा अभेद्य असा महादरवाजा! आजही हा दरवाजा अगदी सुस्थितीत आहे! दरवाज्यावरील चर्या या तर सुबक नक्षीकामाने सजवलेल्या आहेत!

बल्लरी बालेकिल्ल्याचे महाद्वार!
बल्लरी बालेकिल्ल्याचे महाद्वार!

महादरवाजातून आत गेल्यावर विस्तीर्ण मैदानी पठार लागत – संपूर्णत: दगडी! आणि मधोमध उभा आहे तो बलाढ्य असा बालेकिल्ला! याच्या पायऱ्याची रचना फारच वेगळी आहे. दर ३-४ पायऱ्या सोडल्या की एक रॅंप लागतो. बहुदा तोफा चढवण्यासाठी असावा. इतकंच नव्हे, आतील बुरुजावर तोफा चढवायला पण असेच रॅंप आहेत! पाश्चिमात्य संस्कृतींच्या संपर्कात आल्यामुळे भारतीय किल्ले स्थापत्यशास्त्रातील ही सुधारणा म्हणावी की जुन्या सिद्धांतांची उजळणी? कारण कौटिल्य अर्थशास्त्रात ताटावरून रथ सहज धावतील इतके रुंद तट बांधावेत असे म्हंटले आहे. त्यामुळे ते रथ वर चढवायला रॅंप आलेच! पण हैदर अलीने फ्रेंच अभियंत्यासोबत पूर्व-पश्चिम यांचा जो काही मेळ साधलाय या किल्ल्यावर त्याला तोड नाही!

दगडी पठारावर उभा असलेला  बल्लरीचा बलाढ्य बालेकिल्ला!
दगडी पठारावर उभा असलेला बल्लरीचा बलाढ्य बालेकिल्ला!

बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण जागीच थबकतो. कारण समोर उभी असलेली कचेरी/ सैनिकांची राहण्याची इमारत आणि किल्लेदाराचा वाडा इतका “नवीन” वाटतो की जणू कालच सैनिकांचे इथे वास्तव्य होते आणि आजच ते किल्ला उतरून खाली गेले आहेत!

सैनिक/किल्लेदाराचे कचेरी अथवा वाडा
सैनिक/किल्लेदाराचे कचेरी अथवा वाडा

या कचेरी आणि वाड्याच्या मागे आहेत ते दगडातील नैसर्गिक खळगे वापरून तयार केलेले पाण्याचे साठे! बालेकिल्ल्यातच नव्हे तर किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील पाषाणी उतारावर असे अनेक खळगे वापरून पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात किल्ल्यावर पाणी राहतेच पण बालेकिल्ल्याला काही प्रमाणात एका खंदकाप्रमाणे संरक्षण देखील मिळते! वेळेअभावी माझी नजरचूक झाली असेल कदाचित पण माथ्यावर आणखी कोणता बारमाही पाण्याचा साठ सापडला नाही. बल्लरी लोअर फोर्टच्या आवारात नक्की कुठेतरी एखाद दुसरी बावी (बावडी) असायला हवी! कारण पाण्याविना किल्ला न चाले! पाणी गेल्यास किल्ला दुष्मनाच्या हाती पडे!

नैसर्गिक खळगी वापरून केलेला बल्लरी किल्ल्यावरील जलसाठा आणि व्यवस्थापन!
नैसर्गिक खळगी वापरून केलेला बल्लरी किल्ल्यावरील जलसाठा आणि व्यवस्थापन!

बालेकिल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडलं की मागे विस्तीर्ण दगडी पठारावर काही घरटी आणि एक ढासळलेल सुबक शिवमंदिर आहे! जाड-जुड तटांचे संरक्षक रिंगण लाभलेले हे अवशेष मात्र बालेकिल्ल्यातील इमारतींपेक्षा कमी भाग्यवान म्हणावे लागतील. हे अवशेष पंच तत्वांचा मारा सहन करीत कसे बसे तग धरून उभे आहेत. वाईट वाटतं ते ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या शिव मंदिराचं – सुबक नक्षीदार बांधकाम आज मातीच्या ढिगाऱ्यात लुप्त होत चालले आहे! पुरातत्व खाते लवकरच तिथे लक्ष घालून त्याचा जीर्णोद्धार करेल ही आशा मनी बाळगून परत फिरलो.

बल्लरी किल्ल्यावरील ढासळलेलं पण सुबक शिवमंदिर!
बल्लरी किल्ल्यावरील ढासळलेलं पण सुबक शिवमंदिर!

सूर्य क्षितिजाकडे झुकू लागलाय हे लक्षात येताच पावले भरभर पडू लागली आणि आम्ही मोर्चा किल्ल्याच्या पश्चिमेकडे वळवला. बालेकिल्ल्याला वळसा घालून आम्ही तटाकडे जातो न जातो तोच एक कर्कश शिट्टीचा आवाज कानाचे पडदे भेदून आरपार गेला! नजर वर करून पाहताच लक्षात आलं की ५:३० तर केव्हाच वाजून गेले होते. सुरक्षा रक्षकांनी “किल्ला खाली करा” या अर्थी ती शिट्टी वाजवली होती. आता पंचाईत आली! पश्चिम तट तर पहायचा शिल्लक होता पण वेळेची कमी होती! मग काय करावे? कर्नाटकात फिरताना कन्नड भाषा येत नसेल तर जसा काही वेळेला त्रास होतो तसाच काही वेळेस आपले अज्ञान आपल्याच पचनी पाडून घेता येते! हातानेच ५ मिनिट अशी खूण करीत पश्चिम ताटावरून किल्ल्याला फेरी मारून महाद्वाराकडे आम्ही सरकू लागलो! तसे ते सुरक्षाकर्मी आमच्या मागोमाग चालू लागले – खात्री करून घ्यायला! कन्नडमध्ये काहीतरी बोलायला लागले की “कन्नड गोथिल्ला” – म्हणजे “कन्नड येत नाही!” – असं म्हणून आम्ही मोकळ व्हायचो आणि फोटो काढत काढत, रमत गमत पुढे सरकायचो! असं करता करता महाद्वारच उतार सुरु झाला आणि आमचा किल्ला पण बघून झाला! काही वेळी भाषेचं अज्ञान आपल्या फायद्यासाठीही जरी वापरता येत असलं तरीही सहज मनाला कल्पना चाटून गेली – जर मला पुरेसं कन्नड येत असत तर? दूर महाराष्ट्रातून आलेली मराठी पोरं जर आपल्याशी कन्नड मध्ये बोलायला लागली असती तर तो गार्ड काय खूष झाला असता! थोडी ढिलाई दाखवून आम्हाला आणखी थोडा वेळ मनसोक्त फिरायला मिळालं असत! भाषेच्या अज्ञानाने थोडासा वेळ मिळवून दिलं खरा पण त्याच भाषेच्या ज्ञानाने त्या माणसालाच आपलंसं करता येतं! समोरच्या माणसाच्या मायबोलीत बोललात तर त्याच चटकन हृदय जिंकता येतं! भाषा माणसांना जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाहीत!   

विचारांच्या तंद्रीत किल्ल्याचं महाद्वार ओलांडून जवळ जवळ पायथाच गाठला. समोर गार्ड उभा होताच. त्याला म्हणलं, “५ मिनिटं दे बाबा, जरा बसवअण्णा मंदिर बघून येतो!”. त्यानेही, “आरामात या! काही टेन्शन नाही!” अशी हातानेच खूण केल्यावर आम्ही जरा जास्तच खूष झालो! 

बल्लरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी, छोट्या दगडी तटामध्ये टुमदार बसवण्णा मंदिर दिमाखात उभे आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे बसवण्णाचे. बसवण्णा म्हणजे शंभूमहादेवाचं वाहन, “नंदी”. कर्नाटकात अशी अनेक ठिकाणी बसवण्णा मंदिर पाहायला मिळतात. बल्लरीचं मंदिर जरा खासंच आहे! कुठे जास्त शिल्पकला नाही, कुठे जास्त नक्षीकाम नाही की कुठे कोरलेल्या पुराणकथा नाही! ग्रॅनाईटच्या शिळांनी रचलेलं हे साधंसं मंदिर पाहायला मला फारसा वेळ लागला नाही. इतर मंडळी मंदिर पाहण्यात अन फोटो काढण्यात गर्क असल्याचा फायदा घेत मी थेट मंदिराच्या आवाराच्या भिंतीजवळ आलो. पाठीवरचं पाण्याचं ओझं आणि गळ्यातलं कामेऱ्याचं धूड काढून बाजूला ठेवत तिथेच भिंतीला टेकून बैठक मारली. दिवसभर प्रवास अन पायपीट करून पाठीला जरा रग लागली होती म्हणून उबदार भिंतीचा आधार मिळताच जरा बरे वाटले. डोक्यावरची टोपी काढताच मंद वाऱ्याची एक झुळूक घामाने ओल्या चिप्प केसांशी सलगी करून गेली. तिन्हीसांजेच्या ओसरत्या गर्मीत हवा हवा असलेला थंड स्पर्श मिळाला आणि मन शहारून उठले! थकवा कुठे नाहीसा झाला कळलंच नाही! आपसूकच डोळे मिटले गेले आणि क्षणार्धात एखाद्या चित्रफितीसारखी दिवसभराची भटकंती डोळ्याच्या पडद्यावरून झरझर पुढे सरकू लागली!

आंध्रच्या कडकडीत उन्हात पाहिलेला, १३ भक्कम दरवाजे आणि असंख्य बुरुज यांचे कवच कुंडल एखाद्या पराक्रमी योद्ध्यासारखा परिधान केलेला गुत्तीचा रावादुर्ग! इथला एक एक चिरा, मुरारीराव “हिंदुराव” घोरपड्यांच्या पराक्रमाची कहाणी सांगणारा! तिथून निघून बल्लरीला येऊन पाहिलेला, इंडो-युरोपिअन स्थापत्याचा अविष्कार असलेला, खुद्द छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणलेला बल्लरीचा किल्ला! दोन्ही किल्ल्यांना मराठ्यांचा सहवास लाभलेला! इतक्यात आकाशात पक्ष्याची एक शीळ घुमली, विचारांची शृंखला भंगली आणि डोळे चटकन उघडले गेले. समोर उभा ठाकलेला तो सांज देखावा पाहून निःशब्द झालो! अधाशासारखा पाहत राहिलो!

बल्लरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बसवण्णा मंदिराच्या आवारात समोर उभा ठाकलेला सांज देखावा अधाशासारखा पहात राहिलो!
बल्लरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बसवण्णा मंदिराच्या आवारात समोर उभा ठाकलेला सांज देखावा अधाशासारखा पहात राहिलो!

काहीच क्षणांपूर्वी आगपाखड करणारं सूर्याचं रौद्र रूप पार पालटून गेलं.जणू मावळतीची चाहूल लागताच त्याच्या मनात क्षितिजाच्या भेटीची ओढ अनावर झाली होती. एखाद्या माणसाची दिवसभर कचेरीत काम करून चीडचीड झालेली असते, पण प्रेयसीच्या भेटीची ओढ लागताच कशी त्याची कळी खुलते? अगदी तसाच दिवसभर ज्वालामुखी सारखा लाव्हा ओतणारा सूर्य आता क्षितिजाच्या भेटीस जाताना उबदार आणि सौम्य झाला होता! आणि जाता जाता आसमंतात गुलालाची उधळण करीत साहेब निघाले होते! आणि पिवळ्या-केशरी, विरळ ढगांनीच जणू कर्नाटकी कशिदा काम केलेला  भरजरी पदर सावरत, गर्द गुलाबी धारवाडी साडी नेसून एखाद्या नववधू सारखं आकाश नटलं होतं! किलबिलाट करीत पक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या भुकेने कावलेल्या चिमुरड्या पिलांना जेवू घालण्याच्या उर्मीने घराकडे परतत होते. दिवसभर उन्हाचा मारा सहन करत तापलेली दगड-माती आता शांत होत होत्या, त्यांचा एक वेगळाच गंध आसमंतात भरून राहिला होता. जणू दिवसभर फिरून थकल्या भागल्या जीवांच्या कष्टाचं अनपेक्षित फळ म्हणून पंच तत्वांनी आकाशात रंगांचा शिडकावा करीत आपल्या सुरांनी मारवा छेडून एक मंतरलेली मैफिलच उभी केली होती! या मंतरलेल्या मैफिलीत सुरांसमोर शरणागती पत्करून, काळ वेळेचे भान हरपून, मंत्रमुग्ध होऊन मी केव्हाच स्वतःला हरवून बसलो होतो!

“वाघ्या चल रे उशीर होतोय!”, मागून अजयची हाक येताच तंद्री भंगली! भानावर यायला काही क्षण गेले. सूर्य क्षितिजाजवळ पोहोचत आलेला होता. पाय निघत नव्हता पण निघणे अपरिहार्य होते. रिक्षामध्ये बसताना मागे एक नजर टाकली. अंधारात लुप्त होणारा बल्लरी किल्ल्याचा तो महाकाय आकार भलताच आकर्षक वाटला!

आज बल्लरीचा किल्ला पाहून दोन वर्ष झाली. तरीही तिथला प्रत्येक चिरा स्पष्टपणे आठवतो. त्या किल्ल्याचे स्थापत्य तर वेड लावतेच पण हवी हवीशी वाटते ती बसवण्णा मंदिराच्या साक्षीने अनुभवलेली ती अविस्मरणीय संध्याकाळ आणि माझ ते अस्तित्व हरपून जाण! नुसता विचार करू जाता अंगावर रोमांच उभे राहतात!

कारण ती संध्याकाळच मंतरलेली होती!

– प्रांजल वाघ

८ में २०२१

(हा लेख संक्षिप्त रूपात साप्ताहिक सकाळच्या २ ऑगस्ट २०२१ अंकात प्रकाशित झाला होता)

12 comments

Anup Bokil September 5, 2021 - 1:54 PM

Lovely!!!

Reply
Pranjal Wagh September 5, 2021 - 4:40 PM

Thank you so much for the appreciation!!

Reply
Atul Sheelvant September 5, 2021 - 5:42 PM

प्रांजल..
फार छान वर्णन..उत्तम माहिती..इतिहास भूगोल यांचे चांगले ज्ञान यातून दिले..भाषा देखील सहज सुंदर आहे

Reply
Pranjal Wagh September 5, 2021 - 6:03 PM

आभारी आहे अतुलजी!!
जे काही थोडेफार कळते समजते इतिहास-भूगोलातील ते आपल्यासमोर मांडायचा एक छोटासा प्रयत्न !! ????????????????

Reply
Ajay Palekar September 5, 2021 - 6:07 PM

Excellent. Very well written and lovely photos.

Reply
Pranjal Wagh September 5, 2021 - 6:16 PM

Thank you so much Ajay Dada!!

Reply
Suresh Sawant September 5, 2021 - 6:15 PM

Veey interesting write up…. !

Reply
Pranjal Wagh September 5, 2021 - 6:24 PM

Thank you so much Sawant Sir!!

Reply
Bharati pai September 5, 2021 - 6:19 PM

Khoop surekh lihalais….Agadi itaka ki tithe javasa vatata

Reply
Pranjal Wagh September 5, 2021 - 6:25 PM

Thanks a lot for the kind words Kanchan Tai!! ????????????

Reply
Anjali Swami September 11, 2021 - 10:12 AM

खूप छान वर्णन, ते ही ओघवत्या शैलीत! वाचताना तिथे असल्याचा भास होत होता.

Reply
Pranjal Wagh September 11, 2021 - 3:43 PM

आभारी आहे!!
Happy to know that you liked it!! 😀

Reply

Leave a Comment

You may also like