पेशवाईत बांधल्या गेलेल्या गणेश मंदिरांचा एक छोटासा आढावा
श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा संपता संपता वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे! गणपती बाप्पाचे! महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे! भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी बाप्पांचे आगमन होते आणि मग येणारे ११ दिवस भक्तीचा नुसता जल्लोष उसळतो! लोकमान्य टिळकांनी सामाजिक जागृती आणि ऐक्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास सुरु केले. पण खरे तर ह्या आधी कित्येक वर्षे घरोघरी गणपती बाप्पांचा हा उत्सव पार पडत असे. लोकमान्यांनी लोक-भक्तीचा वापर लोक-शक्तीच्या उद्धारासाठी केला. पण त्या अगोदर गणेशाचे एक दैवत म्हणून महत्व महाराष्ट्रात कधी पासून नेमके वाढले?
अठराव्या शतकाच्या सुरुवातीस औरंगझेबाचा मृत्यू झाला अन त्या नंतर मुघल साम्राज्य असतास जाऊ लागले. मराठेशाही उदयास आली. छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत, बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे नर्मदा, यमुना ओलांडून दिल्लीच्या दरवाजावर धडका मारू लागले. ह्याच काळात गणपती हे एक प्रमुख दैवत म्हणून महाराष्ट्रात उदयास आले. गणपतीची बरीच नवीन देवळे बांधली जाऊ लागली. घरो घरी गणेशोत्सव साजरा होऊ लागला. मुळात गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत. त्यामुळेच बरीचशी गणपतीची नवीन मंदिरे पेशव्यांच्या पुण्यातच बांधली गेली.
पेशव्यांचं पुण्यावर विशेष प्रेम होते. शहराचे सुशोभीकरण, लोकांना सोयी- सुविधा पुरवणे, धार्मिक वृद्धीसाठी देवालये बांधणे अशी अनेक कामं पहिले बाजीराव ते दुसरे बाजीराव ह्या पेशव्यांनी केली. ह्यात मुख्यतः नाव घ्यावं लागेल ते नानासाहेब पेशव्यांचं. त्यांच्या कारकिर्दीत पुण्यात अनेक बदल घडत गेले. पुणे शहर “हिंदुस्थानचं नाक” म्हणून प्रसिद्ध होऊ लागलं. ह्याच काळात पुण्यात अनेक गणेश मंदीर बांधली गेली. त्यांतील काही प्रसिद्ध मंदिरांचा घेतलेला हा आढावा.
पुण्याशी एकरूप झालेलं पर्वती मंदिर:

पुणे ह्या नावाशी एकरूप झालेलं मंदिर म्हणजे जगप्रसिद्ध “पर्वती” मंदिर! पुणे शहराच्या आग्नेयास एका छोट्या टेकडीवर वसलेले हे देवतांच्या मंदिरांचे संकुल! पेशव्यांचं दैवत आणि आवडतं देउळ असलेल्या पर्वती देवळाची कथा मोठी रंजक आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे ह्यांच्या माता, काशीबाईसाहेब ह्यांच्या उजव्या पायाला व्याधीने ग्रासले होते. त्यांच्या एका सल्लागाराने पुण्याच्या आग्नेयास असलेल्या एका देवीच्या मंदिराची बातमी दिली. ह्या मंदिरात जाऊन देवीची प्रार्थना केल्यास त्यांचा आजार बरा होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे काशीबाई त्या मंदिरी गेल्या, त्यांनी प्रार्थना केली व “आमचा आजार बरा झाला तर येथे एक भव्य मंदिर बांधू!” असं नवस त्या बोलल्या. लवकरच त्या आजारातून संपूर्णपणे बर्या झाल्या. अन म्हणून नवस पूर्ण करायला श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सुमारे १७४९ मध्ये मंदिराचं बांधकाम सुरु केलं!
हेच ते पर्वती मंदिर!
सुरवातीला येथे फक्त शंकराचे मंदिर बांधले गेले. त्याचे नाव नानासाहेबांनी “देवदेवेश्वर” असे ठेवले – साक्षात देवांचा देव! ह्या व्यतिरिक्त येथे विठ्ठल, विष्णू , कार्तिकेय इत्यादी देवांची देवळ सुद्धा आहेत. पण इथले विशेष म्हणजे देवदेवेश्वराच्या देवळातील गणपतीच्या मूर्ती! सुमारे १०० पायऱ्या चढून आल्यावर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. मंदिरात प्रवेश करताच आपण सद्रेत पोहोचतो जिथे ही गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे.मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पेशव्यांनी खास जयपूरहून ही मूर्ती मागवून घेतली. उत्तर भारतीय शैलीत घडवलेली ही अत्यंत सुंदर मूर्ती संपूर्णपणे संगमरवरी आहे!
मंदिराच्या गाभारयात खास नेपाळमधील गंडकी नदीच्या पत्रातून आणलेल्या दगडातून घडवलेले शिवलिंग आहे. इथेच शंकराची एक मूर्ती आहे आणि खासियत अशी कि ह्या मूर्तीच्या एका मांडीवर पार्वती आणि समोरच्या मांडीवर गणपती आहेत! जेव्हा ह्या मूर्ती घडवल्या गेल्या तेव्हा पेशव्यांनी त्या खास चांदी अन सोन्याच्या बनवल्या होत्या. शंकराची मूर्ती पूर्वीची चांदीची असून ती ६३३७०२ तोळ्याची, पार्वतीची १२४५ तोळे सोन्याची आणि गणेशाची ६८५ तोळे सोन्याची होती. ह्या मूर्ती म्हणजे पेशव्यांची खासगी मालमत्ता होत्या. १८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात आल्यावर इंग्रजांनी ह्या मूर्ती सिंहगडावरून ताब्यात घेतल्या पण लवकरच त्या पर्वती मंदिरास परत देण्यात आल्या. ह्या नंतर १५ जुलै १९३२ ह्या दुर्दैवी दिवशी पार्वती अन गणेशाच्या ह्या मूर्ती चोरीस गेल्या. त्या आजतागायत सापडल्या नाहीत. सध्याच्या गणेश अन पार्वतीच्या मूर्ती पितळेच्या अन तांब्याच्या आहेत.
नयनरम्य सारसबाग:


पर्वती मंदिर संकुलाच्या ईशान्येस पेशवाईत बांधले गेलेले आणखी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे पुण्याचा अभिमान असलेली सारसबाग! सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात, सुमारे १७८४ सालीब बांधले गेलेले हे मंदिर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून आजही उभे आहे – पेशवाईच्या वैभवाची साक्ष देत! नानासाहेब पेशव्यांनी पर्वती मंदिर बांधल्यावर आंबील ओढ्याजवळ एक तलाव बांधायला घेतला. ह्या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट राखून ठेवले. ह्याच बेटावर सवाई माधवराव पेशव्यांनी १७८४ मध्ये श्री सिद्धिविनायक गजानन मंदिर सारसबागेत बांधले! नंतर सुमारी १८६१ नंतर हा तलाव बुजवला गेला आणि त्यावर एक बाग फुलवली गेली.
“|| देवदेवेश्वर सुतं देवं | सारसोद्यान भूषणं ||”
हे शब्द आहेत सारसबागेच्या गणपती मंदिराच्या मंडपातले. सोप्या शब्दात सांगायचं झाल तर – पर्वतीच्या देवदेवेश्वराचा (शंकराचा) पुत्र (गणपती) हा सारसबागेचं भूषण आहे! सारसबागेच मंदिर पूर्वी खरे तर लहान होते पण सुमारे २०० वर्षांच्या कालावधीत ह्या मंदिराचे रूप अनेक वेळा बदलले. ह्यामुळे आजचे सारसबाग मंदिर हे मूळ मंदीराहून बरेच वेगळे आहे.
श्री देवदेवेश्वर ट्रस्ट ही पर्वती आणि सारसबाग मंदिरांचे व्यवस्थापन पाहते. सारसबागेच्या मंदिरात भाविकांची बरीच गर्दी असते. दररोज सुमारे १०००० भाविक गजाननाचे आशीर्वाद घ्यायला ह्या मंदिरात येतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी हाच आकडा रोजी ८०००० च्या घरात जातो!
थेऊरचं चिंतामणी मंदिर:


पुण्यातील गणपती मंदिर आणि पेशवे ह्यांच्यात एक गाढ अध्यात्मिक नातं होतं. तसच थोरल्या माधवरावांच विशेष प्रेम असलेले मंदिर म्हणजे थेऊरचे चिंतामणी गणेश मंदिर! पुण्यापासून २५ कि मी वर असलेलं थेऊरच चिंतामणी मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक. चिंचवड देवस्थान ट्रस्ट ह्या देवळाची देखभाल करते. थेऊरचा चिंतामणी ह्यावर पेशव्यांची गाढ श्रद्धा. माधवराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व त्यांची चिंतामणीवर असलेली श्रद्धा इतकी गाढ होती की प्रत्येक लढाई अगोदर थेऊरला भेट देऊन चिंतामणीचा आशीर्वाद घेत असत. सध्याचं असलेलं देवळाच कार्यालय म्हजे माधवरावांचे थेऊर मधील निवासस्थान! क्षयरोगाने ग्रासलेले माधवराव त्यांच्या शेवटच्या दिवसात थेऊरच्या मंदिरात तळ ठोकून होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो देखील ह्याच चिंतामणी मंदिरामध्ये!
अष्टविनायकांपैकी ५ वे मंदिर होण्याचा मान ह्या मंदिरास लाभलेला आहे. मंदिर बरेच भव्य आहे आणि मंदिरात माधवराव पेशव्यांनी बांधलेला लाकडी सभामंडप आजही उभा आहे. थेऊरचा चिंतामणी हा स्वयंभू आहे. गणपतीची सोंड डावीकडे वळली असून, त्याचे दोन तेजस्वी नेत्र मूर्तीवर उठून दिसतात. मूर्तीला फसलेला भगवा शेंदूर ह्यातून ते दोन नेत्र सार्या विश्वाच्या हालचालींवर नजर ठेवून आहे असं काही क्षण भास होतो!
मोदी गणपती उर्फ बोम्बल्या गणपती:
पर्वती, सारसबाग आणि थेऊरचा चिंतामणी ही पुण्यातील पेशवे काळातील काही प्रसिद्ध आणि मोठी मंदिरे. तसेच पुणे शहरात असंख्य गणेश मंदिर आजच्या दिवशी आहेत. पण त्यातली काही मुद्दाम उल्लेख करण्यासारखी आहेत! उजव्या सोंडेचा गणपीत सहज सापडत नाही आणि तो स्वयंभू असणे हा तर चमत्कारच म्हणायला हवा! असाच एक गणपती आपल्याला सापडतो पुण्याच्या नारायण पेठेत! पेशवेकालीन असेलेलं हे मंदिर भट परिवाराने बांधलेलं! नाव मोदी गणपती! निदान २०० वर्ष तरी पुराण! उदरनिर्वाहासाठी कोकणातून पुण्यात स्थलांतर केलेल्या भट परिवाराने हे मंदिर बांधले आहे. ह्याची बांधणी पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. ह्या मंदिराचे बांधकाम १९व्या शतकाच्या सुरुवातीश झाले असावे. मंदिराचा गाभारा आणि कळस हे अगोदर बांधले असून लाकडी मंडप हा नंतर बांधण्यात आला. मंडपातील लाकडी खांबांवरील कलाकुसर ही अत्यंत सुंदर असून मंडपाची रचना कोकणातील काही मंदिरांची आठवण करून देते! मंदिराचा कळस देवळी पद्धतीने बांधलेला आहे. अनेक मेघडांबरींचे थर एकेमेकावर रचून बांधला गेलेला हा कळस आहे.
मोदी गणपतीला बोम्ब्ल्या गणपती ह्या मजेशीर नावाने देखील संबोधतात!ह्या मागची गम्मत म्हणजे जवळच बोंबील विकायला कोळी बसायचे! आणि बोंबील जिथे विकले जातात तिथे हे गणपतीचे देउळ – म्हणून मोदी गणपती हा बोम्ब्ल्या गणपती!
गुंडाचा गणपती:

नारायण पेठेतून निघून कसबा पेठेत आपण दाखल झालो की आणखीन एक पेशवेकालीन मंदिर आपल्या नजरेस पडते. ह्या गणपतीच्या नावाची देखील एक गम्मत आहे! ह्या गणपतीचं नाव गुंडाचा गणपती असं आहे! पण त्याचा गुंडांशी , दरोडेखोरांशी काहीच संबंध नाही! पेशवाईत हे देउळ नसून गणपतीची मूर्ती एका पिंपळाच्या झाडाखाली असायची. आणि हा पिंपळ जिथे उभा होता तिथे जवळच “गुंड” नावाच्या गृहस्थांच घर होतं. म्हणून ह्या गणपतीला गुंडाचा गणपती म्हणतात!
कसबा पेठेतला गणपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जागरूक असेलल पुण्याचा दैवत! त्याच कसबा पेठेतील आणखीन एक महत्वाचं दैवत म्हणून ह्या गुंडाच्या गणपती कडे पाहता येईल!
मूळची गणेश मूर्ती दीड फुटाची होती. तिला जवळ जवळ २०० वर्षे शेंदूर लावून-लावून ती उंचीने वाढली. १९७५ पर्यंत त्याची उंची ४ फूट झाली होती. १९७५ मध्ये गुंडाच्या गणपतीची मूर्ती भंग पावली – वर जमलेला शेंदुराचा थर निघून आला. त्याचवेळीस लक्षात आले की आतली गणेशमूर्ती देखील भंगली आहे. दगडातून नवीन मूर्ती घडवून १९७६ मध्ये, नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. तो भंग पावलेला शेंदूराचा ठार आजही राजा केळकर म्युझियम मध्ये दिमाखात ठेवले आहे!
त्रिशुंड मयुरेश्वर गणपती:


गुंडाचा गणपती पाहून झाल्यावर आपण वळूया सोमवार पेठेच्या गल्लीबोळात लपलेल्या एका उत्कृष्ठ गणेश मंदिराकडे. कॉंक्रीटच्या जंगलात दुर्लक्षित असलेला आणि बहुतांशी लोकांना माहिती नसलेलं हे मंदिर आहे – त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर! नागझारीच्या किनार्यावर वसलेलं , पेशवाईत बांधलं गेलेलं, विविध मूर्ती आणि कोरीव कामाने नटलेलं मंदिर म्हणजे सोमवार पेठेचं आकर्षण आहे! सन १७५४ म्हणजे भीमजी गोसावी ह्यांनी त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर बांधले. काळ्या पाषाणातून निर्मिलेलं हे मंदिर आजही उन पाऊस वारा सहन करून उभे आहे.
ह्या मंदिराची खासियत अशी की ह्या मंदिराच्या वास्तूला कळस नाही! त्याच्या जागी एक घुमट आहे! हे मंदिर म्हणजे उत्तर – दक्षिण स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे! मंदिरात प्रवेश करण्याआधीच दोन यक्ष तुमची वाट अडवतात. मंदिराच्या दरवाज्याच्या चौकटीवर गजलक्ष्मीचे शिल्प आहे. त्रिशुंड गणपती मंदिराची खासियत इथली गणपतीची मूर्ती आहे! इथल्या गणपतीला ३ सोंडा, ६ हात असून तो मोरावर विराजमान आहे! म्हणूनच ह्या देवळाला त्रिशुंड (३ सोंडा) मयुरेश्वर गणपती मंदिर असे संबोधले जाते. ह्या मूर्ती मध्ये गणरायांच्या मांडीवर देवी शक्ती बसलेली आहे.
गंधर्व, यक्ष सार्यांची शिल्प ह्या देवळात सापडतात. शिवाय भगवान विष्णू, भगवान शंकर इत्यादी अनेकांची शिल्प आहेत. देवळाच्या गर्भगृहात ३ शिलालेख आहेत. त्यातील २ मराठी आणि एक फारशी भाषेत आहे. मराठी शिलालेखावर देवळाच्या स्थापनेची तारिख, दुसऱ्यावर गीतेतला एक श्लोक आणि तिसर्या फारशी शिलालेखात हे देउळ गुरुदेवदताच आहे असे सांगण्यात आले आहे.
एखादा सुट्टीचा दिवस पाहून पुण्यातली आणि आसपासची ही देवळ पाहून घ्या.आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेली ही मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. एखाद दिवशी “हेरीटेज वॉक” , “फोटोग्राफी ट्रेल” इत्यादी आयोजित करून ह्या सगळ्या खजीन्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करून घ्या!!
-प्रांजल वाघ
Instagram : @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
YouTube Channel : Son Of Sahyadris
(वरील लेख “माझी सहेली – सप्टेंबर २०१४” मध्ये पूर्वप्रकाशित झालेला आहे)

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).
This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.
2 comments
खूपच सुंदर लेख
मनःपूर्वक आभार!!