कधी कोण सरदार एखाद्या राजा विरुद्ध बंडाळी करून उठतो. कधी अन्याया विरुद्ध, कधी अधर्मा विरुद्ध, कधी स्वार्थासाठी! मग राज्यांच्या सीमा आखल्या जातात. कशा? कधी युद्ध खेळून, कधी बुद्धीच्या बळावर! राज्य स्थापन होते! मग राज्याचा विस्तार केला जातो! अनेक रणवीरांच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि काहींच्या हौतात्म्याच्या जोरावर हा विस्तार टिकतो! राज्याचे वर्धन होते, संवर्धन होते! इतिहासात अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. शिवछत्रपतींचे उदाहरण सोडले तर सर्वात ठळक म्हणजे धनानंदाच्या अन्यायाविरुद्ध एखादा विष्णुगुप्त उठतो आणि सिंहासनाच्या लायक असलेला चंद्रगुप्त मौर्य शोधून, राजकारण करून त्याला राजगादीवर बसवतो आणि भारताला बदलणारा इतिहास घडवतो!
पण राज्ये चिरकाल टिकून साम्राज्ये कशी बनतात? सातवाहन, चालुक्य, गुप्त, मौर्य ही साम्राज्ये खऱ्या अर्थाने “साम्राज्ये” का होतात? बऱ्याच वेळा हा प्रश्न मनाला सतावतो. पण त्याचे उत्तरही सोपे आहे! आपल्या समोर आहे तरीही दडलेले आहे! युद्धाच्या रम्य कथा, तहाची कंटाळवाणी कलमे या साऱ्यांच्या मागे लपलेले आहे. ते आवरण बाजूला केलं की उत्तर स्पष्ट होतं – राज्याचे अर्थकारण!
समजायला वरवर जरी कठीण आणि क्लिष्ट असलं तरी अर्थकारण हे इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे “कॉमन सेन्स”वर आधारित आहे! राजाचे प्रथम कर्तव्य प्रजेचे पालन आणि संरक्षण हे असते. प्रजेला पोट भरण्याची साधनं उपलब्ध करून देणं, लोकोपयोगी प्रकल्प उभे करण, सामर्थ्यवान सैन्य उभे करणे आणि राखणे, इतर राज्यांशी मैत्रीपूर्व संबंध स्थापित करणे, व्यापार वाढवणे, हेर खाते मजबूत करणे, आपल्या पदरची रत्ने राखून आपल्याजवळच राहतील याची काळजी घेणे – हीच तर राजाची मुख्य कर्तव्ये नाहीत का? आणि हे सगळे करण्यासाठी एकंच गोष्ट लागते! आणि ती म्हणजे पैसा! आणि राज्याकडे पैसा कसा येतो? आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रांतर्गत व्यापारातून! पण मग हा व्यापार ज्या मार्गाने होतो – त्या मार्गावर संरक्षण देखील द्यावे लागते! कधी हे मार्ग समुद्री असतात, कधी पठारी प्रदेशातून तर कैक वेळा डोंगराच्या अंगाखांद्यावर खेळणारे!
याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या सह्याद्रीत असलेल्या घाटवाटा आणि त्यांचे संरक्षण करणारे तितकेच प्राचीन दुर्ग! घाटवाट आणि दुर्ग ही जोडगोळी म्हणजे इतिहासाचे साक्षीदार जणू! एखादा इतिहासवेडा भटका जर या परिसरात गेला तर त्याला भूतकाळात जायला काळयंत्राची मुळीच गरज भासत नाही! तिथे पाऊल टाकताच तो भूतकाळात ओढला जातो!
गेल्या रविवारी अशाच एका प्राचीन परिसरात जाण्याचा योग आला! लोणावळ्याजवळच असलेला हा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या माथ्यावरून खाली कोकणात नागमोडी वळणं घेत उतरणाऱ्या प्राचीन घाटवाटा आणि त्यांच्यावरून होणार्या वाहतुकीवर करडी नजर रोखून युगानुयुगे उभे असलेले दुर्ग यांचा समूहच जणू!

लोणावळ्याहून पुढे कोरीगडाच्या पुढे गेल्यावर सालतरची खिंड ओलांडली की आपल्या नजरेत पडते ती एक लाव्हारासातून निर्माण झालेली सरळसोट उभी कातळभिंत! प्राचीन भारतात ते अगदी पेशवेकाळापर्यंत कोकणातील बंदरातून देशावर आणि देशावरून कोकणातील बंदरात व्यापार्यांचे तांडे माल भरून ये जा करत. कोकणातून सह्याद्रीची अंगावर येणारी उभी भिंत चढून आल्यावर दमलेल्या बैलांना आणि त्यांच्या मालकांना विश्रांती घ्यायला, दाणापाणी करायला, इथे असलेल्या चौक्यांवर नोंदी करायला, कागदपत्रांची देवाणघेवाण करून जकात भरायला हे पठार वापरले जायचे. या जागेला “बैल तळ” असे म्हणत असं इथले स्थानिक सांगतात. आणि म्हणून या किल्ल्याचं नाव अपभ्रंश होऊन “तेल-बैला” असे झाले असावे!
खालील छायाचित्रात जो मोठं डोंगर दिसतो त्याला “मारठाण्याचा डोंगर” म्हणतात आणि त्या डोंगरातून फुटून पुढे आलेल्या नाकावर छोटेखानी घनगड उभारलेला आहे. ही झाली त्रिकोणाची दोन टोकं. या त्रिकोणाचे तिसरे टोकं म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य भिंतीपासून जरासा हटकून उभा असलेला भोराईदेवीचा डोंगर! खाली कोकणात उभ्या असलेल्या या बुलंद डोंगरावर कुणीतरी तटा-बुरुजांची आभूषणं चढवली आणि या भोराईदेवीच्या डोंगराला “सुधागड” असं संबोधू लागले! या दुर्गत्रयीच्या कडक पहाऱ्यात आजही इथे अक्षरशः दाटीवाटीने घाटवाटा तग धरून आहेत! काही सुस्थितीत तर काही काळाचे आणि निसर्गाचे घाव सोशीत मध्येच कुठेतरी झाडीत लुप्त झालेल्या आणि तुटलेल्या!
वाघजाई घाट, सवाष्णीचा घाट, घोडेजीनाची वाट, भोरप्याची नाळ, या थेट तेलबैलाच्या खाली तर आमराईची वाट, नाणदांड घाट, डेऱ्या घाट अशे एक न अनेक छोट्या मोठ्या घाटवाटा याच परिसरातून चढतात-उतरतात! यातील काही वाटा आजही रुळलेल्या आहेत, गावकऱ्यांच्या पायठशांनी आजही इथे जाग आहे! अशा ठिकाणी लेणी नसतील तर नवलच! याच ठिकाणी, सह्याद्रीच्या कुशीत, दाट झाडीच आवरण पांघरून वसलाय एक भन्नाट बौध्द लेणीसमूह – ठाणाळे!

ही सारी ठिकाणं इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत! या साऱ्या इतिहासपुरुषांच्या सावलीतून भटकंती करून, सवाष्णी घाटाच्या वाटेने वर चढायला सुरुवात केली. सह्याद्रीचा उभा चढ चढून. जड पायांनी, धपापत्या उराने आणि घामाच्या धारांनी भिजून जसे तेलबैलाच्या पठारावर पाऊल टाकले तोच पावसाने गाठले! उभ्या कोसळणाऱ्या जलधारांनी अक्षरशः धुवून काढले! बंदुकीच्या गोळ्या लागाव्या तसे पावसाचे थेंब बोचत होते! चढताना आलेला थकवा कुठल्या कुठे पळाला! मग पावसाचा आनंद घेत, छत्री, रेनकोटाशिवाय तसाच तेलबैला गावाकडे निघालो! आणि चालता चालता सामोरचे दृश्य पाहून थबकलो! गडगडणाऱ्या कृष्णमेघांच्या गंभीर नादाने आसमंत भारून गेला होता. झाडांच्या पानांवरच काय पण शेतातील भाताच्या रोपट्यांवर देखील पावसाचे टपोरे थेंब टपटप वाजत होते. पावसाचं पाणी जमिनीवर बरसून ओहोळ बनून सैरावैरा धावत होते. वाहत, खळाळत हे झरे दाहीदिशांनी येऊन एकमेकांना भेटत होते आणि कुठेतरी एकत्र होऊन हा पाण्याचा प्रपात कड्यावरून बेभानपणे खाली कोकणात झेपावत होता, सिंधुसागाराच्या भेटीच्या ओढीने! आणि या साऱ्या चंचल सृष्टीत काळानंतर कोणी शाश्वत असतील तर माझ्यासमोर असलेल्या तैलबैलाच्या ध्यानस्थ भिंती, मारठाण्याच्या महाकाय डोंगराच्या सावलीत ओलाचिंब झालेला घनगड आणि खाली कोकणात ढगांच्या दुलईत गुरफटून अदृश्य झालेला सुधागड!
सहज मनाला एक विचार चाटून गेला. हजार-दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा हा परिसर गजबजलेला असेल तेव्हा इथे काय परिस्थिती असेल? हा असा विचार करताच चंचल मनाने, कल्पनेच्या वारूला टाच मारली आणि तुफान वेगाने दौडत क्षणार्धात मला भूतकाळात घेऊन गेला! बघता बघता समोरील रिकामं पडलेलं विस्तीर्ण पठार गजबजून गेलं. व्यापारी तांडे, त्यांच्या राहुट्या दिसू लागल्या. त्यांच्या बाहेर पेटलेल्या शेकोट्या-चुलींवर डाळ-भात शिजत होता. धुरांचे मनोरे आकाशी गेले तसे त्या पावसात गरमागरम भोजनाचा घमघमाट आसमंती भरून राहिला होता. तेवढ्यात घाट चढून आलेल्या काही बैलांची ओझी उतरवायला सेवक धावले, बैलांना डाव्यांना बांधून त्यांच्या चाऱ्या-पाण्याची केली गेली. घाट चढता उतरता बैलांना काही इजा झाली असेल तर त्यांच्यावर उपचार करण्यात वैद्य मग्न होते. जवळच असलेल्या चौकीवरील अधिकाऱ्यांना तांड्याचे प्रमुख परवाने सादर करत होते, काही मुकादम नवे परवाने मिळवत होते. सगळी कागदोपत्री लिखापढी करून, जकात भरून एखादा तांडा कोकणच्या दिशेने उतरायला सुरु करत होता तर दुसरा तांडा दख्खनच्या पठारावरील वसलेल्या समृद्ध नगरींच्या दिशेने कूच करीत होता. कुठे जात असतील ते? पुनवडी? जुन्नर? की आणि कुठे? तितक्यात कुठूनसे मोठ-मोठ्याने आवाज आले म्हणून तिथे लक्ष गेले आणि पाहतो तो काय? दोन व्यापारी तांडे एकमेकांना भिडले होते. एक प्रकारची वाहतूक कोंडीच झाली होती! कोण आधी चढणार – उतरणार यावरून हमरी – तुमरी सुरु झाली आणि क्षणात व्यापार्यांचे हत्यारबंद सेवक एकमेकांना भिडले! बैल उधळून कडेलोट होण्याची शक्यता ओळखताच, तंटा सोडवायला मग चौकीवरची सैनिकांची तुकडी धावली! योग्य त्या लोकांना चोप देऊन, वाहतूक कोंडी सोडवून, तांड्यांना आप-आपल्या मार्गी लावले! तितक्यात क्षितिजावरून भगवी वस्त्रे परिधान केलेले काही बौध्द भिख्खू ठाणाळे लेण्यांतून वर आले. बहुदा भाजे-कार्ले-बेडसे येथील लेण्यात जात असावेत! हा सारा गोंधळ सुरु असताना देखील या साऱ्या कारभाराची एक लय जुळून आली होती आणि याच व्यापारातून राज्याचे अर्थकारण मजबूत होत जात होते! साम्राज्य समृद्ध होत जात असे! आणि या साऱ्यावर करडी नजर ठेवून अचल उभे होते या घाटवाटांचे संरक्षक असलेले ते तीन प्राचीन दुर्ग!
तितक्यात पावसाची एक जोरदार सर आली आणि समोरील दृश्य अंधुक होत होत पाण्याच्या त्या पडद्यामागे झाकले गेले – दिसेनासे झाले तसा मी गावाच्या दिशेने पुढे चालू लागलो. पावसाचं जोर ओसरताच मागे वळून पहिले. संपूर्ण पठार रिकामे होते! कल्पनाशक्तीच्या कुंचल्याने मी रंगवलेल्या चित्राचे रंग वाळण्याअगोदरच पावसाने ते धुवून काढले होते! आता त्या ओसाड पठारावरील क्षणाचे साक्षीदार म्हणून उभे होतो चिंब भिजलेले आम्ही तिघं! मी आणि ते दोन प्राचीन गडपुरुष!
सर्वभक्षी काळाने एक छोटासा खेळ करून दाखवला होता!
प्रांजल वाघ
०७.०८.२०२२
(त.क. : काही चुकलं असेल तर हक्काने तसे सांगा!)