रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून,
सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो…
आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले,
म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो!
मग त्याची नजर वर जाते, काळे ढग शोधण्याची
एक केविलवाणी धडपड, ती करू लागते!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून,
इंद्राची आराधना करीत, तो रोजच चालत असतो!
अन मग तो दिवस येतो! ढग दाटून येतात,
गार हवेतील पावसाचा तो गंध मन सुखावून जातो!
पावसाची चाहूल लागताच, थकवा दूर पळतो!
पायाला जणू पंख फुटून, तो तरंगतच चालत राहतो!
पण कितीही वाट पहिली तरी, पाऊस काही येत नाही!
चिंब भिजण्याचा आनंद, त्याला काही केल्या मिळत नाही!
मग तो नाराज होतो, काहीसा हिरमुसतो,
दूर जाणाऱ्या ढगांकडे पाहून, चक्क दोन-चार शिव्या देतो!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून,
पावसाला नावं ठेवत, तो नाईलाजानं चालत असतो!
पण मग तो रस्त्यातच थबकतो, जाणाऱ्या ढगांकडे पाहतो
अन मग त्याला दिसू लागतो, तो दुष्काळ ग्रस्त गाव!
भेगाळलेल्या ओसाड शेतात बसलेला, कोरड्या आभाळाकडे पावसाची विनवणी करणारा,
पोट खपाटीला गेलेला, तो म्हातारा बाबा!
शाळेतून घरी आल्यावर, आई बरोबर मैल अन मैल,
सुकलेल्या विहिरीतून पाणी आणायला गेलेली, ती चिमुरडी पोरं!
कळून न कळल्यासारखं करणारे, पैसे खाऊन सुद्धा भुकेले,
शाब्दिक लघवी करणारे, मख्ख चेहऱ्याचे माजलेले पुढारी!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून,
पहिल्यांदाच दुसऱ्यांचा विचार करीत, तो चालत असतो!
मग तो खिन्नपणे हसतो! स्वतःच पावसाला जायला सांगतो,
गावात बरसून तो आनंद देईल, म्हणून तो खूष होतो!
मग पाऊस सुद्धा त्याचं ऐकतो, गावागावात जाऊन कोसळतो!
तहानलेल्या धरेची तहान, वेड्यासारखा बरसून भागवतो!
सगळीकडे तो हिरवळ नेतो, शेतात डौलदार पिकं उगवतो!
सुकलेल्या अश्रूंच्या खुणा धुवून टाकतो अन डोळ्यात हसू भरतो!
अजूनही इथे सूर्य जळत असतो, पण तिथल्या पावसाची कल्पना करून
त्यांच्या आनंदातच, तो चिंब भिजून गेलेला असतो!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून,
मनात एक वेगळंच सुख घेऊन, तो आता चालत असतो!
–
प्रांजल वाघ
९ जून २०१३
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License
2 comments
Excellent!
🙂